भिवंडीच्या भाजीपाला मार्केटमध्ये साचले पावसाचे पाणी

भिवंडी: भिवंडीत आज दुपारनंतर झालेल्या अर्ध्या-पाऊण तासाच्या पावसाने शिवाजीनगरमधील भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचून जाण्या-येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. तर भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले.

शहरात पावसाळ्याची अजून फारशी सुरुवात देखील झाली नाही तरी शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार सुरु झाले. महानगरपालिकेने नाले व गटार सफाई करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे ठेके दिले आहेत. मात्र ठेकेदारांकडून पालिकेच्या स्वच्छता विभागातील मुकादम व आरोग्य निरीक्षक योग्यप्रकारे काम करून घेत नसल्याने पावसाचे पाणी योग्यरीत्या प्रवाहित न होता ठिकठिकाणी साचून राहिले आहे.

शिवाजीनगर येथील भाजीपाला मार्केट हे शहराच्या प्रमुख नाल्याच्या स्लॅबवर भरत आहे. नाल्यातील पाणी प्रवाहित न झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले. तर या भागात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांना जाता आले नाही.