ठाण्याच्या मैदानात पावसाने ठोकले द्विशतक

दिव्यात नाल्यात पडून मुलगा वाहून गेला

ठाणे: मागील २४ तासात ठाणे शहरात तब्बल २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला असून एक १६ वर्षाचा मुलगा नाल्यात पडून वाहून गेल्याची घटना दिवा परिसरात घडली आहे. काल पडलेल्या पावसात १९ झाडे उन्मळून पडली. पावसाने उसंत घेतल्याने गुरुवारी जनजीवन सामान्य होते.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल शहरात मुसळधार पाऊस पडला होता. दुपारी १२.३० ते १.३० च्या दरम्यान सर्वाधिक ४६ मिमी पावसाची ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या पावसामुळे शहरातील ३८ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या होत्या.

शहरातील खोपट सिग्नल येथे वडाचे तर तलावपाळी येथे एक अशी ३८ झाडे उन्मळून पडली तर ११ झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी आणि कोणीही जखमी झाले नाही.
मुंब्रा येथील एम एम कंपाऊंड येथे राहणार सय्यद वसीम हा मुलगा काल दुपारी २ वाजता एम एम कंपाऊंड येथील नाल्यात पडून वाहून गेला आहे. त्याचा शोध मुंब्रा अग्निशमन दलाचे जवान कालपासून घेत आहेत, परंतु पाण्याच्या प्रवाहाचा जोर जास्त असल्याने अग्निशमन दलाने काल शोध काम थांबवले होते. आज सकाळी पुन्हा एकदा शोध काम सुरू करण्यात आले होते, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुपारी शोध कार्य थांबविण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केले.

शहरातील विविध भागात पाणी तुंबल्याने आणि राष्ट्रीय महामार्गावर तसेच घोडबंदर येथील रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. शहरात सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे काल चित्र होते. आज पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन सामान्य झाले होते.