आयुक्त अभिजित बांगर यांनी केली पाहणी
ठाणे : पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचते, अशा ठिकाणांची पाहणी आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.
अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. सखल भागात साचत असलेले पाणी पंपाच्या साहाय्याने नाल्यात सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच रस्त्यावरील पावसाळी गटाराची झाकणे उघडून वाहून आलेला कचरा तातडीने साफ करण्याचे निर्देश या पाहणीदरम्यान आयुक्तांनी दिले.
वंदना एस.टी. डेपो परिसरात पावसात पाणी साचून हा परिसर जलमय होतो, या ठिकाणचे कलव्हर्ट वाढवून किंवा होल्डिंग पाँडच्या माध्यमातून पाण्याचा निचरा होऊ शकेल का याची शक्यता पडताळून पहावी. तसेच या ठिकाणी या ठिकाणी पंप उपलब्ध केले असून सदर पंपाचे पाणी एस.टी डेपोच्या बाजूच्या नाल्यात न सोडता रस्ता क्रॉस करुन नाल्याच्या पुढील भागामध्ये सोडणे शक्य असेल तर तशी कार्यवाही करावी, जेणेकरुन वंदना चौकातील पाण्याचा फुगवटा वाढणार नाही. अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच वंदना एस.टी. डेपो परिसरापासून ते गजानन महाराज मठापर्यत असलेल्या सर्व पावसाळी गटारांवरील जाळ्या काढून वाहून आलेला कचरा दैनंदिन साफ करण्याचे निर्देश स्वच्छता निरीक्षकांना आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.
जांभळी नाका येथील पेढया मारुती परिसरातील पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी या ठिकाणी खोल खड्डा करुन पंपाच्या सहाय्याने पाणी नाल्याच्या खालच्या भागात सोडण्याची कार्यवाही करावी, जेणेकरुन मारुती मंदिराच्या बाजूच्या परिसरात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. या परिसरात पाणी कोणत्या स्तरापर्यत साचते, त्यावर काय मार्ग निघू शकतो याबाबत आयुक्त श्री. बांगर यांनी परिसरातील स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. तलावपाळीवरुन पाण्याचा ओव्हरफ्लो पेढया मंदिराच्या बाजूच्या नाल्यामध्ये न जावू देता जर दुसऱ्या बाजूच्या नाल्यात सोडला तर त्या परिसरातील पाणी साचण्यावर मार्ग निघू शकेल, तसेच त्या संपूर्ण परिसरातील पावसाळी गटारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला निदर्शनास आला. त्या गाळाची साफसफाई व्हावी म्हणून चेंबर्सची संख्या वाढवावी किंवा संपूर्ण पावसाळी गटार खुले करुन गाळ काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिले.
तसेच चिखलवाडी, भांजेवाडी या परिसरात लावण्यात आलेल्या पंपाची पाहणी देखील आयुक्तांनी केली. या ठिकाणी असलेल्या तबेल्यांमध्ये निर्माण होणारा कचरा किंवा इतर टाकावू गोष्टी घेवून जाण्यासाठी स्थानिक स्वच्छता निरीक्षक यांनी नियमित गाडीची खेप उपलब्ध करुन द्यावी, मात्र त्यांनतरही जर तबेले धारकांनी नाल्यामध्ये कचरा टाकला तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याची ताकीद संबंधितांना दिली. चिखलवाडी परिसरातील पंपाद्वारे काढण्यात येणारे पाणी रस्तयावर सोडले जात असल्याचे आढळले, तेच पाणी रस्ता क्रॉस करुन नवीन कोपरी पुलाच्या बाजूच्या पावसाळी गटारामध्ये सोडले तर पुन्हा त्या चौकामध्ये पाणी साचणार नाही ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्या पध्दतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या समोर चिखलवाडी व मेंटल हॉस्पिटलकडून येणारे दोन नाले एकत्र येतात. मेंटल हॉस्पिटलकडून येणाऱ्या नाल्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे चिखलवाडीकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी निचरा होवू शकत नाही व पाण्याचा फुगवटा वाढून मागे पाणी साचण्याची शक्यता निर्माण होते यासाठी दोन्ही नाले ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी वक्राकार पध्दतीने तात्पुरती भिंत बांधावी जेणेकरुन चिखलवाडी भागातून येणारे नाल्याचे पाणीही निचरा होवू शकेल अशा पध्दतीने कार्यवाही त्वरीत करण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.
यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, तुषार पवार, शंकर पाटोळे तसेच विभागातील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.