कल्याण: गुरुवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण शहराला चांगलेच झोडपून काढले. कल्याण ग्रामीण भागांतील द्वारली, आडवली, ढोकली गावांतील चाळीत पाणी भरले होते तर कल्याण शहरातील शिवाजी चौकातील रस्ते पाण्याखाली गेल्याने गुडघाभर पावसातून वाहने चालवावी लागत होते.
कल्याण पश्चिम भागांतील सखल भागातील चाळी वस्तीमधील पाटीलनगर, रामबाग, काळा तलाव, टिळक चौक, जरीमरी, शिवाजी चौक गुरूदेव हॉटेल रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. कल्याण ग्रामीण भागांतील आडिवली, ढोकळी आणि द्वारली गावांतील चाळी परिसरात जागोजागी पावसाचे पाणी तुंबले होते. या भागांतील पावसाचे पाणी चाळीमध्ये घुसले होते. पावसाचे पाणी या भागात साचल्याने गुडघाभर पाण्यातून या भागातील महिला आणि नागरिक घरांकडे जात होते.
सकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरल्याने त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर झाला होता. ठाणे उपनगरातील कल्याण रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कल्याण रेल्वे स्थानकातून कर्जत-कसारा मार्गावर जाणार्या लोकल अर्धा-एक तास उशीरा धावत असल्याने कर्जत -कसाराकडे जाणार्या लोकलमध्ये कामावरून घरी परतणार्या चाकरमान्यांसह नोकरदार वर्गाचे हाल झाले होते. महिलांच्या डब्ब्यात तर तुडुंब गर्दी होती. दरवाजावर लटकून महिला प्रवास करीत होत्या. मुसळधार पावसात रेल्वे डब्ब्याचा दरवाजा बंद करता येत नसल्याने पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी धावत्या लोकलमध्ये छत्री उघडून प्रवास करताना दिसून आल्या.