धुके सुरक्षा यंत्रणा ठरणार गेमचेंजर
पुणे : धुक्याच्या वातावरणातील अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने ५०० धुके सुरक्षा यंत्रणा (फॉग सेफ्टी डिव्हाईस) खरेदी करून सर्व विभागांना वाटप केले आहे. तसेच, नव्याने तेवढ्याच यंत्रणांचा प्रस्ताव पाठविला आहे. या यंत्रणेमुळे सिग्नल दृश्यमानता कमी असताना रेल्वे चालकांना सिग्नलबाबत सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे धुके असताना देखील गाड्यांचा वेग कमी होणार नाही.
हिवाळ्यात दाट धुके पडल्यानंतर दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. रेल्वे गाड्या ३० ते ६० प्रतितास वेगाने चालवाव्या लागतात. काही दिवसांपूर्वीच पुणे विभागाला याचा अनुभव आला होता. पहाटे दोन ते सकाळी सात दरम्यान दाट धुके पडल्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांना उशीर झाला होता. यावर पर्याय म्हणून मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्रणा खरेदी केली आहे. त्याचे विभागानुसार वाटप केले आहे. त्यानुसार सध्या पुणे विभागाला अशा प्रकारची दहा यंत्रणा मिळाल्या आहेत. तसेच, नव्याने १८० ची मागणी करण्यात आली आहे.
धुके सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्य
धुके सुरक्षा यंत्रणा हे जीपीएस तंत्रज्ञानावर चालते. त्यामुळे रेल्वे चालकांना आगामी तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि चित्रित संकेतांद्वारे आगाऊ सूचना मिळते. हे उपकरण केवळ पुढील सिग्नलचे वर्णन दाखवत नाही तर इंजिन आणि सिग्नलमधील मध्यवर्ती अंतर देखील सूचित करते. त्यामुळे आगामी बदलांसाठी योग्य तयारी करणे शक्य होते. वास्तविक स्थानाच्या ५०० मीटर अगोदर सिग्नलचे दिशा जाहीर करून, रेल्वे चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी ही यंत्रणा सतर्क करते. चालकास अधिक सुसज्ज राहण्यास मदत करते.
धुक्यामुळे कमी दृश्यमानतेच्या घटनांमध्ये गाड्यांचा वेग सामान्यतः ३०-६० किलोमीटर प्रतितास दरम्यान असतो. धुके सुरक्षा यंत्रणेच्या अंमलबजावणीमुळे जास्तीत जास्त ७५ किलोमीटर प्रतितास वेग मिळू शकतो. त्यामुळे गाड्यांचा खोळंबा करणारा कालावधी कमी होतो आणि वक्तशीरपणा वाढतो यामुळे रेल्वेगाड्यांना उशीर होणार नाही.