बोगस कॉल सेंटरवर धाड; ११ जण ताब्यात

ठाणे: परदेशातील नागरिकांना शासकीय अधिकारी असल्याचे भासवून त्यांना किसननगर येथील कॉल सेंटरवरून धमकी देणाऱ्या ११ जणांना ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हैदर अली मन्सूरी, भविन शहा, तुषार परमार आणि रायलन कौर्लोअस आणि इतर सात अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वागळे इस्टेट येथील सनराईज बिझनेस पार्क येथील कॉल सेंटर येथून अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिकांना बोगस कॉल करून ते अमेरिकन इंटरनॅशनल रेव्येनु सर्व्हिस आणि सेक्युरिटीचे शासकीय अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी कर चुकवला आहे, त्यांना दंड भरावा लागेल अशी खोटी माहिती देऊन त्यांच्याकडून अमेरिकेतील साथीदारांच्या मदतीने पैसे उकळले जात असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांना मिळाली होती. त्यानुसर वागळे येथील किसन नगर परिसरातील कॉल सेंटरवर पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारण्यात आला होता. पोलिसांनी अटक आरोपीकडून रोकड लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईल, मॉडेम आणि कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या सर्वांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.