सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

मुंबई: भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने तब्बल २३७ जागांवर विजय मिळवला असल्याने विरोधकांच्या बाजूने अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

या निवडीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना आश्वस्त करत तुमची संख्या कमी असली तरी तुमचा आवाज कमी होऊ देणार नाही, असा शब्द राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राहुल नार्वेकर म्हणाले की, “सर्वांच्या सदिच्छा सोबत घेत मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारत आहे. आजच्या या विधानसभेतील चित्र सत्तारूढ पक्षाच्या बाजूने असले, महायुतीचे एकूण २३७ आमदार असले तरीही विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना समान संधी देण्याची ग्वाही आज मी या सभागृहाला देतो. संख्या कमी असली तरी विरोधकांचा आवाज कमी राहणार नाही, ही जबाबदारी माझी राहील,” असं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं.

दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे ॲड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे १९६२ आणि १९६७ असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. सयाजी सिलम हेही दोनवेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळालं आहे.

कुलाबा या विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यावेळी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. ३ जुलै २०२२ रोजी ते विधानसभा अध्यक्ष झाले. विधानभवनची इमारत ही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातच येते. ते बी.कॉम. एलएल.बी. आहेत. पूर्वी एकदा विधानपरिषदेचेही ते सदस्य होते. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांचे विधि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.