बॅनरबाजीविरोधात गुन्हे दाखल करण्याचे महापौरांचे आदेश
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत महिला बालकल्याण समितीमधील विविध योजनांतील गैरप्रकारांवरून काँग्रेस नगरसेवक सभागृहात आरोप करत असताना दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीत काँग्रेस कार्यकत्यांनी अंगावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे बॅनर झळकावले. त्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली. कार्यकत्यांच्या अंगावरील बॅनर सुरक्षा रक्षकांनी काढून घेतल्याने वातावरण चांगलेच तापले.
मीरा-भाईंदर महापालिका महासभेत महिला बालकल्याण समितीमधील विविध योजनांच्या अटी, शर्ती ठरविण्याच्या धोरणास मंजुरीचा प्रस्ताव आला होता तर काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत, जुबेर इनामदार, मर्लिन डिसा आदींनी समितीच्या योजनांमधील बोगस व अपात्र लाभार्थी, होत असलेले गैरप्रकार आदी मुद्दे उपस्थित करून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांची अडचण केली. सभागृहात भाजप व काँग्रेस अशी जुंपली असतानाच प्रेक्षक गॅलरीत असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, महिला जिल्हाध्यक्ष रूपा पिंटो, कार्याध्यक्ष फरीद कुरेशी, यास्मिन खान, युवक काँग्रेसचे दीप काकडे, सिद्धेश राणे, कुणाल काटकर, अनवर खान, दीपक बागरी, मुकुल त्यागी यांनी ‘१८ कोटींचा हिशोब द्या’ असा उल्लेख असलेले बॅनर अंगावर घालून उभे राहिले.
महापौरांनी ‘फलक काढून कार्यकर्त्यांना बाहेर काढा व गुन्हा दाखल करा’, असा आदेश दिल्यावर सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांनी घातलेले बॅनर काढून घेतले. त्यावेळी गोंधळ झाला. काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महापौरांनीच काँग्रेसवर भ्रष्टाचार केल्याचा आणि तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसले. सभागृहातदेखील काँग्रेसने ठराव मांडताना महिला बालकल्याण समितीमधील घरघंटी वाटप, शालेय बॅग वाटपमधील बोगस लाभार्थी दाखवून उकळलेले पैसे परत करावेत तसेच या प्रकरणातील गैरप्रकाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली.