धावत्या एक्सप्रेसमध्ये जातीयवाद; महिलेवर हल्ला

पालघर: हातामध्ये असणाऱ्या रुद्राक्ष माळेच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेवरील अवंतिका एक्सप्रेसमध्ये सुरू झालेला वाद चिघळून ठाणे येथील एका महिलेवर अल्पसंख्यांक समाजाच्या महिलेने व एका सहकारी प्रवासी पुरुषाने धारदार वस्तूने वार केला. तिच्याभोवती अल्पसंख्याक समाज बांधवांनी कडे निर्माण करून या महिलेवर हल्ला केला. हेल्पलाइनला फोन केल्यानंतर या महिलेला वलसाड येथे उतरवण्यात आले व उपचार केल्यानंतर पालघर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

३ मे रोजी आपल्या इंदोर येथे शिकत असलेल्या मुलाला घरी आणण्यासाठी ठाण्यातील रहिवासी ॲड. शितल भोसले या अवंतिका एक्सप्रेसमधून सामान्य डब्यातून प्रवास करत निघाल्या होत्या. या सामान्य डब्यात बहुतांश सहप्रवासी अल्पसंख्याक असल्याची माहिती पीडित महिलेने दिली आहे. ही गाडी विरारच्या पलीकडे आल्यानंतर ॲड. शितल भोसले यांच्या हातात असलेली रुद्राक्ष माळ व छत्रपतींचे नाव पाहून शेजारी बसलेल्या एका अल्पसंख्याक महिला प्रवाशाने वाद-विवाद सुरू केला. “आप ये रुद्राक्ष पेहेनते हो क्या बकवास हैं,” असे सांगितल्यावरून वाद सुरू झाला व पीडित महिलेने, “तुझ्या बुरख्याचा मला त्रास होतो असं मी म्हटलं का, मग तुला माझ्या माळांचा त्रास का होतो” असा वाद चिघळला.

अवंतिका एक्सप्रेसने विरार रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले व पालघर रेल्वे स्टेशन गाडी ओलांडण्याच्या स्थितीत ॲड. शितल भोसले यांच्यावर धारदार वस्तूने सरळ वार केल्याची या महिलेने तक्रार नोंदवली आहे. या हल्ल्यात अल्पसंख्याक महिलेला मानेवर वार करायचा होता, पण तो चुकवण्यात ॲड. शितल भोसले यांना यश लाभले. या हल्ल्यात त्यांच्या हातावर हल्ला झाला. ही गाडी वापी स्टेशनला थांबली असताना या महिलेने फलाटावर असणाऱ्या होमगार्ड याला मदतीसाठी साद घातली. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद लाभला नाही, असे त्या महिलेने पालघर येथील नागरिकांना सांगितले. दरम्यान या संदर्भात हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्यात आल्याने वलसाड रेल्वे स्थानकात पीडित महिलेला तसेच हल्ला करणाऱ्या एक महिला व पुरुष प्रवासाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेवर उपचार करून तक्रार नोंदवण्यासाठी तिला आज सकाळी नऊ वाजता पालघर रेल्वे स्थानकात आणून रेल्वे पोलिसांमार्फत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात रेल्वे लोहमार्गचे पोलीस अधिक्षक पालघर येथे येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

या जातीयवाद विवादामध्ये डब्यातील अल्पसंख्यांक समाजाचे बांधव एकत्र होऊन त्यांनी या महिलेला घेरले. दरम्यान पिडीत महिलेला हल्ला करणाऱ्या महिलेकडून विवस्त्र करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे आरोप पीडित महिलेने केले आहे. हा हल्ला सुरू असताना कोणालाही व्हिडिओ चित्रीकरण अथवा छायाचित्र काढण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच हिंदू समाजाशी संबंधित विविध घटकांचे प्रतिनिधी या ठिकाणी गोळा झाले त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पालघर शहर पोलिसांची मदत घेण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.