नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारात मागील काही दिवसांपासून फळांची आवक वाढत चालली आहे. ही आवक वाढल्याने फळ बाजाराबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून या परिसरात दुपारपर्यंत वाहतूक कोंडी दिसून येत असते.
सध्या उन्हाचा पारा चढत असल्याने व रमजान महिना सुरू असल्याने रसदार फळांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात कलिंगड, टरबूज, पपई अशा फळांची आवक वाढली आहे. सोबतच बाजारात हापूस आंब्याच्या हंगामाने जोर पकडला आहे. होळीनंतर बाजारात हापूसची आवक देखील वाढली असून रोज ५० हजारावर पेट्या बाजारात दाखल होत आहेत. परिणामी बाजारात सर्वच फळांना मागणी वाढल्याने रोज ५०० च्यावर वर गाड्या दाखल होत आहेत.
मंगळवार २ एप्रिल रोजी बाजारात एकूण ५३४ गाड्या आवक झाली होती. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने गाड्या खाली करण्यास विलंब लागत असतो. परिणामी बाजार आवारात जागा कमी पडत असल्याने बाजाराबाहेर या गाड्यांच्या लांबच लांब रांग लागत आहेत. त्यामुळे तुर्भे-वाशी लिंक रोडवर तुर्भेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडी दिसून येत आहे.