दहा किमीच्या रांगा; ठाणेकरांचा त्रागा!

ट्रक बंद पडल्याने घोडबंदर मार्गाची १२ तास कोंडी

ठाणे: घोडबंदर मार्गांवर गायमुख घाटामध्ये मध्यरात्री साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास राख घेऊन जाणारा ट्रक बंद पडला. ट्रक दोन क्रेनच्या मदतीने देखिल ढिम्म हलत नसल्याने घोडबंदर मार्गांवर दोन्ही बाजूला वाहनांच्या सुमारे दहा किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले.

गायमुख घाट येथून या वाहनांच्या रांगा थेट कापूरबावडी नाक्यापर्यंत पोहोचल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तसेच बंद पडलेला ट्रक गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास हलवण्यात आल्यानंतर जवळपास बारा तासांनी वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली.

नाशिकचे सचिन नीलकंठ यांच्या मालकीचा हा ट्रक असून यामधून ५० टन राख घेऊन चालक निघाला होता. तो गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास गायमुख घाटामधील नीरा केंद्रच्या चढणीवर अचानक बंद पडला. त्या ट्रकची वाहतूक पोलिसांनी पाहणी केली तेव्हा त्या ट्रकचे भाग आणि जोड तुटल्याचे लक्षात आले. शिवाय प्रेशर पाईपही फाटला होता. शिवाय बूस्टर तुटल्याने तो ट्रक दोन क्रेन लावूनही बाजूला हलत नव्हता. त्यातच घोडबंदर रोडवर मेट्रोचे काम सुरू आहे. या शिवाय रात्रीच्या वेळी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. दरम्यान घोडबंदर ठाणे वाहिनीवर मेट्रोचे काम चालू असल्यामुळे येणाऱ्या वाहिनीचा बॅकलॉग देखील फाउंटन हॉटेलपर्यंत गेलेला असल्याने दुसऱ्या वाहिनीवरील कामे वाहतुक पोलिसांनी तत्काळ बंद करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

सकाळी नोकरदार वर्गाची कामाला जाण्यासाठी लगबग सुरू झाल्याने वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत त्याची भर पडली. यामुळे सकाळीच घोडबंदर रोडवरील वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. यामुळे गायमुख येथून कापूरबावडी नाक्यापर्यंत वाहनांच्या उड्डाणपुलावर आणि त्याखालील रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. अखेर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो ट्रक बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर कुठे दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.

घोडबंदर मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचा फायदा रिक्षा चालकांनी उचलला. ५० रुपये शेयर रिक्षाचा दर ७० ते ८० रुपये इतका घेतला जात होता. त्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना सर्रासपणे भाडे नाकारत होते. या मार्गांवर टीएमटी, एसटी, बेस्ट या बस वाहतूक कोंडी दरम्यान आल्या नाहीत, त्यामुळे घोडबंदर वासियांना नाइलाजाने जास्त भाडे देऊन ठाणे स्टेशन गाठावे लागले.