ठाणे: अमेरिका-इराण युद्ध सुरूच असल्याने आता इंधनाची झळ भारताला बसू लागली आहे. ठाणे शहरात पेट्रोल टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शहरातील वाहन चालकांमध्ये पेट्रोल, डिझेल संपल्याच्या अफवेने वाहन चालक पंपांकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंपांवर दुचाकीपेक्षा चार चाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असून वाहन चालकांकडून इंधनाच्या टाक्या भरून घेतल्या जात आहेत.
अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ठाण्याला देखील फटका बसला आहे. गुरुवारी (ता.26) शहरातील पंपांवर इंधन (पेट्रोल, डिझेल, गॅस) भरून घेण्याकरता वाहनचालकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या वेळी नागरिकांनी पंपांवर इंधन भरून घेण्यासाठी पंपांकडे धाव घेतली. त्यामुळे वाढलेली गर्दी पाहून शहरातील लोकांमध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरू लागल्या. या अफवा ऐकून काही जणांनी वाहनांमध्ये पेट्रोल असतानाही टाकी पूर्ण भरण्याकरिता पंपांकडे मोर्चा वळविला. रांगा रस्त्यापर्यंत गेल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळाली.
तीन पेट्रोल पंप परिसरात दोन पंप जवळ-जवळ असल्याने या दोन्ही पंपांवर वाहन चालकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. मात्र पेट्रोल मुबलक मिळत असल्याने काही वेळाने शहरातील रांगा कमी झाल्या. चार चाकी वाहनांची संख्या मात्र कमी होताना दिसत नव्हती.
सकाळी एका वाहिनीने ठाण्यातील पेट्रोल पुरवठा संपल्याची बातमी दाखवल्याने शहरात पेट्रोल भरण्याकरिता लोकांनी धावपळ सुरू केली. पेट्रोल संपेल म्हणून हातातील कामे सोडून काहीजण पंपावर आले होते. लोकमान्य नगरात राहणारे सागर येडे या दुचाकी चालकाने कापूरबावडी येथील पंपावर पेट्रोल भरण्याकरता आल्याचे सांगितले परंतु येथे आल्यावर सहज पेट्रोल उपलब्ध झाले. पण खबरदारी म्हणून टाकी भरून पेट्रोल घेतले असल्याचे सांगितले.
मखमली तलाव येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने पंपावर नेहमीप्रमाणेच आजही गर्दी असल्याचे सांगितले. परंतु रोजच्या प्रमाणात बहुतांश वाहन चालक जादाचे पेट्रोल भरून घेत होते असा दुजोरा दिला.