फेरीवाल्यांचा ‘फेरा’; वाहतूक कोंडीची ‘पीडा’!

* नगरसेवकांच्या तक्रारींना केराची टोपली

ठाणे : ठाणे शहरातील रस्ते दिवसेंदिवस फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद होत आहेत. सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सुचनांना महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

नौपाडा, मुख्य बाजारपेठ, उथळसर, राबोडी, वागळे येथिल किसननगर, इंदिरानगर, पडवळनगर, श्रीनगर, वर्तकनगर, पोखरण रोड १ आणि २, घोडबंदर रोडमधील मानपाडा, कापुरबावडी नाका, कासारवडवली, हिरानंदानी, कोलशेत, ओवळा नाका, हायलँड, वसंत विहार, शिवाईनगर नाका, कोपरी पूर्व, कळवा, खारीगाव, कळवा पूर्व, विटावा, मुंब्रा, कौसा, दिवा, दातीवली आदी भागातील रस्ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. त्या-त्या भागातील गावगुंड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने बिनधास्त रस्ते काबीज करत आहेत. महापालिकेचे अधिकारी कारवाईकरिता येणार असल्याची माहिती अतिक्रमण विरोधी पथकातील कामगार फेरीवाल्यांना देतात, त्यामुळे कारवाईला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सकाळी-संध्याकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना स्टेशन गाठताना तारेवरची कसरत करावी लागते, अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा देखिल मुकाबला करावा लागत असतो. वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस यांचे देखिल हात फेरीवाले ओले करत असतात, त्यामुळे ते देखिल कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत.

वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी रस्त्यावर पिवळ्या पट्ट्या मारून फेरीवाल्यांची त्या पट्ट्याच्या आत सोय केली जाईल, असे जाहीर केले होते. परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

मुख्य बाजारपेठ येथे रुंद केलेला रस्ता फेरीवाल्यांना विकत दिला काय असा सवाल ठाणेकर आणि स्थानिक दुकानदार विचारत आहेत. सर्वसाधारण सभेत फेरीवाल्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधींनी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यावर आरोप केले, परंतु अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

शहरातील सर्वच चौक फेरीवाल्यांनी गिळंकृत केले असून त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी महासभेत ५० लाखांचा हप्ता फेरीवाल्यांकडून गोळा केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन देणाऱ्या महापालिकेला कधी जाग येणार असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत.