भरधाव कारच्या धडकेत सुप्रसिद्ध व्यावसायिक सायकलस्वाराचा मृत्यू

* अल्पवयीन कारचालक ताब्यात
* रिंगरोड ठरला अपघातांचा हॉट स्पॉट

कल्याण : कल्याणमधील हिट अँड रन प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या अपघातात व्यावसायिक तसेच सायकलिस्ट श्रीनिवास तांदळे यांचा मृत्यू झाला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाच्या आईविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर तिला अटक होण्याची शक्यता असून अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मंगळवारी रात्री एका अल्पवयीन मुलाने घरातून कारची चावी घेतली अन् तो रिंग रोडने निघाला होता. परंतु, त्याच दरम्यान अल्पवयीन मुलाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीला त्याने धडक दिली. या धडकेत कल्याणमधील प्रसिद्ध व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी कार जप्त केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याणमधील गांधारीजवळून जाणारा रिंग रोड हा आता भरधाव कारचालकांमुळे अपघाताचा हॉटस्पॉट ठरला आहे. या रिंग रोडवर सुरू असलेले मुजोर वाहन चालकाचे स्टंट आता रिंग रूटवर किंवा मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तांदळे यांना आज सकाळी कल्याण सायकलिस्ट ग्रुप, बाईकपोर्ट सायकलिस्ट ग्रुप, रनर्स ग्रुपचे सदस्य आणि इतर प्रतिष्ठीत नागरिकांनी रिंगरोडवर एकत्र येत श्रद्धांजली वाहिली. यावेळी कल्याण सायकलिस्ट ग्रुपचे डॉ. रेहनुमा, संदेश परदेशी, संजय पाटील, बाईक पोर्टचे साहिर, डॉ. प्रशांत पाटील, आंतरराष्ट्रीय धावपटू दिलीप घाडगे, धावपटू आणि सायकलिस्ट प्रशांत भागवत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

या रस्त्यावर धूम स्टाईल बाईक चालवण्यासोबतच रेसिंग ट्रॅकप्रमाणे वेगाने मोठ्या गाड्या चालवण्याची स्पर्धा लागलेली या स्पर्धेच्या नादामध्ये गाडीवरील नियंत्रण सुटून रिंगरोडवर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यांनी गस्त वाढवणे, स्पीड लिमिट, दिशाफलक लावणे, ड्रंक आणि ड्राईव्हविरोधात कारवाईसारख्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रिंगरोडवर अनधिकृत टपऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंग रोडवरील वाहतुकीस आणि निष्पाप नागरिकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, उपहारगृह अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे आणि स्पीड ब्रेकर उभारणे, अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अशा मागण्या यावेळी उपस्थित सायकलिस्ट, धावपटू आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडून करण्यात आल्या.