दिवा स्थानकात तिकिटासाठी लागणाऱ्या रांगा संपणार

अतिरिक्त आठ नवीन एटीव्हीएम मशीन उपलब्ध

ठाणे : दिवा स्थानाकातून मुंबई, कर्जत-कसारा, कोकण, पनवेल, वसई या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अपुऱ्या तिकीट खिडक्यांमुळे प्रवाशांचा जास्तीचा वेळ तिकीटांसाठी लागणाऱ्या रांगेतच वाया जात होता. आता नवीन अतिरिक्त आठ एटीव्हीएम यंत्रे बसवण्यात आल्याने या रांगा संपणार आहेत.

दिवा स्थानकात अपुऱ्या एटीव्हीएम मशीन व बऱ्याच वेळा त्या बंद असल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिवा स्थानकात तब्बल आठ नवीन अतिरिक्त एटीव्हीएम मशीन बसविल्या जाणार आहेत. प्रत्येक पादचारी पुलावर दोन यंत्रे बसवण्यात येणार असून, शिल्लक दोन यंत्रे तिकीट घरामध्ये बसवली जाणार आहेत. या यंत्रांवर तेथे उपस्थित असलेल्या फॅसिलेटरतर्फे तिकीटे दिली जाणार आहेत शिवाय ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्यामधून आपण तिकीट काढून शकतो, असे मध्य रेल्वेने सूचित केले आहे.

सध्याच्या स्थितीला मध्यभागी असणाऱ्या पादचारी पुलावर एकही एटीव्हीएम यंत्र नसल्यामुळे मुंब्रादेवी कॉलनी परिसरातील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी अधिक त्रास सहन करावा लागत होता. आता या पादचारी पुलावर दोन नवीन यंत्रे बसवण्यात आल्याने प्रवाशांचा त्रास वाचणार आहे.

याशिवाय दिवा शहराची ९० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही पूर्वेला असून, एकमेव तिकीट घर हे पश्चिमेला आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीटघरातून तिकीट काढण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावे लागत होते, अन्यथा पादचारी पूल दोनदा चढावा-उतरावा लागत होता. या गोष्टीची दखल घेत स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागणी करून दिवा पूर्वेला देखील नवीन तिकीटघराची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली होती आणि त्यामुळेच आज दिवा शहराच्या पूर्वेला कल्याण दिशेकडे नवीन तिकीट घराचे काम जलद गतीने सुरू असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. दिवा स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अनेक वर्ष प्रवाशांसाठी लढणाऱ्या दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रवाशांनी याबाबतीत आभार व्यक्त केले आहेत.