रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत अतुल कुलकर्णी यांचे भाकित
ठाणे: उद्योग, कृषी आणि पर्यटन क्षेत्रांच्या विकासाची मोठी क्षमता असलेला इशान्य भारतातील पूर्वांचल प्रदेश विकासाच्या वाटेवर असून नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केल्यास भविष्यात पुर्वांचल शाश्वत विकासाचे मूर्त स्वरूप ठरेल. असे भाकित आय.आय.एम. शिलाँग न्यासी मंडळाचे सदस्य तसेच, अमेझिंग नमस्ते फाऊंडेशन, गुवाहाटी या संस्थेचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी केले.
ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कुलच्या पटांगणात ४० वी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेत मंगळवारी “विकासाच्या वाटेवरील पूर्वांचल” हे सहावे पुष्प अतुल कुलकर्णी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर, व्याख्यानमालेच्या या सत्राच्या अध्यक्षा ॲड. वर्षा कोल्हटकर तसेच अभाविपचे अनेक जुने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन माधुरी तहामाने यांनी केले.
कुलकर्णी यांनी, पूर्वीचा आणि आताचा पुर्वांचल ठाणेकरांसमोर उलगडताना पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे अनेक बाबींवर प्रकाश टाकला. भारताचा ईशान्य भाग असलेल्या पूर्वांचलमध्ये आसाम,अरुणाचल प्रदेश, मणीपुर, त्रिपुरा, मिझोरम, नागालँड, मेघालय ही राज्ये येतात. एकट्या अरुणाचलमध्येच पाच उपनद्या असून त्यांच्या पाच व्हॅली आहेत. महाभारतातील अनेक घटना तसेच पुराण काळातील वैशिष्ट्यांचे साक्षीदार असलेल्या पुर्वांचलमध्ये १८१४ मध्ये पहिला मिशनरी पोहचला तरीही, पुर्वांचलने आपली संस्कृती आजही टिकवून ठेवली आहे, असे स्पष्ट करून कुलकर्णी यांनी, पुर्वांचलच्या शाश्वत विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन योजनांची गरज व्यक्त केली. ज्यात शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच रेल्वे कनेक्टीव्हीटी, रस्ते आदी दळवळणाच्या मुबलक सुविधा व डिजिटल कनेक्टीव्हीटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कामे केली तरच हा प्रदेश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकेल. असेही त्यांनी स्पष्ट केले.