आज वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 चा पहिला आठवडा संपुष्टात येत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये, या पाच संघांच्या स्पर्धेत एकमेव अपराजित संघ ठरला आहे तो म्हणजे WPL 2024 चा विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी). सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे आरसीबी पुन्हा एकदा विजेतेपदाचा भक्कम दावेदार मानला जात आहे. मात्र आज त्यांच्या समोर उभे आहे आत्मविश्वासाने खेळणारे गुजरात जायंट्स.
या सामन्याची सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे गुजरात जायंट्सची सलामीवीर सोफी डिवाइन, जिने दोन हंगाम आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. आरसीबीच्या विजेतेपदाच्या मोहिमेत डिवाइन आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी सलामीला भक्कम भागीदारी रचली होती. मात्र आता डिवाइन प्रतिस्पर्धी संघात आहे. या सामन्यात ती काय करू शकते, याची जाणीव दोन्ही संघांना आहे. 2023 मध्ये मुंबईतच, आरसीबीसाठी खेळताना डिवाइनने जायंट्सविरुद्ध केवळ 36 चेंडूत 99 धावा ठोकून WPL मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली होती. गेल्या रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तिने 42 चेंडूत 95 धावा करत तो विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर उतरताना आरसीबीला तिच्याविरुद्ध क्षणाचाही निष्काळजीपणा परवडणारा नाही.
डिवाइनसोबतच गुजरात जायंट्सकडून खेळणाऱ्या आरसीबीच्या आणखी दोन माजी खेळाडूंवरही लक्ष असणार आहे. भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू जॉर्जिया वेअरहॅम या आज आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना दिसतील. 2023 पासून रेणुका आरसीबीचा महत्त्वाचा भाग होती, तर मागील दोन हंगाम आरसीबीकडून खेळल्यानंतर वेअरहॅम पुन्हा जायंट्सकडे परतली आहे. आरसीबीच्या गोलंदाजीचा कणा राहिलेल्या या दोघींनी मानधना आणि रिचा घोषसारख्या फलंदाजांसोबत नेट्समध्ये भरपूर सराव केला असल्याने त्यांचा अनुभव गुजरातसाठी मोलाचा ठरू शकतो.
या सामन्यातील सर्वात रोचक लढत असेल ती मानधना आणि रेणुका यांच्यात. उजव्या हाताची वेगवान गोलंदाज असलेल्या रेणुकाने या हंगामात घेतलेल्या तीनपैकी दोन विकेट्स पॉवरप्लेमध्ये घेतले आहेत. दुसरीकडे, सांगलीकर असलेली मानधना, या हंगामात पॉवरप्लेमध्ये केवळ एकदाच वेगवान गोलंदाजाकडून बाद झाली आहे. भारतासाठी एकत्र खेळलेल्या या दोघींमध्ये आज रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.
आणखी एक जबरदस्त ‘मॅच-अप’ पाहायला मिळेल तो म्हणजे डिवाइन विरुद्ध आरसीबीची सलामीची गोलंदाज लॉरेन बेल. जरी डिवाइन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करत असली आणि बेल इंग्लंडकडून खेळत असली, तरी गेल्या वर्षी ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सदर्न ब्रेव्ह संघासाठी एकत्र खेळलेल्या या दोघींना एकमेकींच्या ताकदी आणि उणिवांची पुरेपूर कल्पना असेल.
गुजरातसाठी बेथ मूनी आणि सोफी डिवाइन यांची सलामी जोडी भक्कम दिसत असताना, आरसीबीकडून ग्रेस हॅरिस आणि स्मृती मानधना ही जोडी तितकीच आक्रमक ठरत आहे. त्यामुळे जायंट्सची कर्णधार आणि ऑफस्पिनर ऍश्ले गार्डनर पॉवरप्लेमध्ये स्वतः गोलंदाजीला येऊन आरसीबीच्या सलामीवीरांवर आवर घालण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विशेष म्हणजे हॅरिस आणि गार्डनर या दोघी ऑस्ट्रेलियासाठी एकत्र खेळतात, तर डावखुऱ्या मानधनासमोर ऑफस्पिनरचे आव्हान अधिकच कठीण ठरू शकते.
आरसीबी सलग दोन विजयांच्या आत्मविश्वासावर मैदानात उतरणार आहे, तर गुजरात जायंट्सने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर मागील सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारला होता. महत्त्वाचे गुण पणाला लागले असताना आज कोणता संघ सहा गुणांपर्यंत मजल मारणार — रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू की गुजरात जायंट्स?
आमने-सामने (मागील 5 सामने)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 3 | गुजरात जायंट्स – 2
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 16 जानेवारी 2026
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमी, नवी मुंबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार