ठाण्यात २२० पर्दानशीन, ११ सखी आणि १० आदर्श मतदान केंद्रे

ठाणे: ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ व निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी शहरात पर्दानशीन महिलांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच ११ ठिकाणी सखी मतदान केंद्र तर १० ठिकाणी आदर्श मतदान केंद्रही तयार करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

कळवा प्रभाग समिती अंतर्गत 16, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 125, तर दिवा प्रभाग समिती अंतर्गत 79 अशी एकूण 220 पर्दानशीन महिला मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. महिला मतदारांना अधिक सोयीस्कर वातावरण मिळावे यासाठी मतदान अधिकारी क्रमांक 1 सह महिला अधिकारी व महिला कर्मचारी, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना कोणतीही अडचण किंवा संकोच न वाटता आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अनेक भागांत धार्मिक व सामाजिक कारणांमुळे काही महिला मतदारांना सार्वजनिक ठिकाणी मतदान करताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन पर्दानशीन महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे, यामुळे महिला मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सखी मतदान केंद्र पोतदार शाळा, हिरानंदानी इस्टेट येथे तर आदर्श मतदान केंद्र हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल, पातलीपाडा येथे असेल. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत सखी व आदर्श मतदान केंद्र डॉ. बेडेकर विद्यामंदिर, तळमजला, महात्मा फुले रोड, नौपाडा, उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सखी मतदान केंद्र मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, उथळसर, आदर्श मतदान केंद्र सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, पाचपाखाडी, ठाणे, वागळे प्रभाग समिती अंतर्गत सखी मतदान केंद्र टिसा हाऊस रोड नं. 16, नेहरुनगर, वागळे अग्निशमन केंद्राच्या मागे, वागळे इस्टेट तर आदर्श मतदान केंद्र हे महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळ, महाराष्ट्र कोकण उपविभागीय खोली क्र. 1 येथे असेल.

लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत सखी मतदान केंद्र मालदान एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशन, विद्यानिकेतन, इंग्लीश स्कूल, शास्त्रीनगर, आदर्श मतदान केंद्र संकल्प शाळा, पाटीलवाडी, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत सखी मतदान केंद्र डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, सुप्रिम डेली हॉल, वर्तकनगर, आदर्श मतदान केंद्र श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. 1 येथे असेल.

कळवा प्रभाग समिती अंतर्गत सखी मतदान केंद्र उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, सह्याद्री शाळेसमोर, कळवा, आदर्श मतदान केंद्र सहकार विद्या प्रसारक मंडळ, कळवा, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत सखी मतदान केंद्र एंजेल पॅरेडाईज शाळा, तळमजला, खोली नं. 1 नारायणनगर, मुंब्रा, सखी व आदर्श मतदान केंद्र एम एस कॉलेज, शोएब एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी, चाँद नगर, कौसा मुंब्रा तसेच दिवा प्रभाग समिती अंतर्गत सखी व आदर्श मतदान केंद्र न्यू गुरूकुल कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्लोक नगर, दिवा, दातिवली रोड, दिवा पूर्व आणि सखी व आदर्श मतदान केंद्र मेस्को स्कूल, कौसा येथे असेल.