एमएमआरडीए क्षेत्रात साडेपाच लाख नवीन वाहनांची खरेदी

ठाणे शहरात एक लाख १२,२०७ वाहनांची नोंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत सार्वजनिक आणि शासकीय क्षेत्रातील परिवहन यंत्रणांच्या अपुऱ्या सेवेला कंटाळलेल्या असंख्य चाकरमान्यांनी स्वत:ची वाहने खरेदी केली आहेत. एमएमआरडीए क्षेत्रात सन २०२३ मध्ये तब्बल साडेपाच लाखांहून वाहनांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ठाणे महानगरात एक लाख 12,207 वाहनांची नोंदणी झाली.

मुंबई महानगर क्षेत्रात सन 2023 मध्ये तब्बल साडेपाच लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. खाजगी बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्ज देण्यास सुरुवात केल्यामुळे वाहन घेणे शक्य होत आहे. त्यामुळे स्वत:चीच वाहने खरेदी करण्याचा कल आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, वसई, विरार, मीरा-भाईंदर, कल्याण, डोंबिवली या महानगरांमध्ये नव्याको-या, त्यातही ‘हाय एंड’वाहनांचे ‘शेपूट’वाढतच चालले आहे, अशी माहिती ठाणे आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली.

मुंबईच्या चारही प्रादेशिक परिवहन विभागात तब्बल दोन लाख 37,951 आणि ठाणे भागात एक लाख 12,207 वाहने, कल्याण येथे 79,317 गाड्यांची आणि वसई भागात 82,357 इतक्या वाहनांची नोंद झाली आहे.

सर्वच वाहने १५ वर्षानंतर जुनी झाल्यानंतर ती चालवण्यासाठी अयोग्य असतात. मात्र तरीही जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर, मुरबाड, नवी मुंबई, उल्हासनगर, शहापूर येथे आहेत. त्यामुळे अयोग्य झालेली वाहने वापरून ‘ती’ रस्त्यावर चालवण्याची ‘टेंडन्सी’अनेक चालकांची आहे. त्यामुळे अरुंद असलेल्या रस्त्यांवर अशी वाहने सर्रास चालवली जातात.