वेगमर्यादा ओलांडणाऱ्या चालकांना ‘ई-चलान’ धाडले
ठाणे : साधा सरळ रस्ता…कोणतेही अवघड वळण नाही…अपघाती क्षेत्राची भीतीही नाही, असे असताना मुंब्रा बायपासवर तुम्ही ताशी ३० किमीच्यापुढे वाहनांची वेग मर्यादा नेल्यास थेट ‘ई – चलान’चा बडगा वाहतूक शाखेकडून उगारला जातो. या विचित्र नियमाचा फटका अनेक वाहन चालकांना बसला असून कासवछाप गतीने गाड्या चालवूनही दंडाचा दंडुका बसत असल्याने मुंब्रा बायपासवर वाहन चालकांनो ‘धीरे चलना’ असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
मुंब्रा बायपास आणि अपघात हे समीकरण असल्याने वाहन चालक आधीच सावधपणे या मार्गावरून गाड्या चालवतात. मात्र तरीही या मार्गावर एका ठिकाणी ताशी ३० किमी वेगाने वाहने चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपघात विरहित वळण असल्याने याठिकाणी साहजिकच वाहनांची वेग मर्यादा ताशी ३० किमी वेगाच्यापुढे जाते. त्याचवेळी वाहतूक शाखेच्या कॅमेऱ्यात वाहनाची छबी टिपण्यात येते. तसेच या वाहन चालकाला थेट ई-चलान धाडण्यात येते.
ठाण्यातील मयूर महाजन यांना या ठिकाणीच दोन वेगवेगळ्या वाहनांबाबत दंड आकारण्यात आला. त्यामुळे दोन हजार रुपये दंडाची रक्कम महाजन यांना भरावी लागली. मात्र ठाणे वाहतूक शाखेच्या या अजब नियमावलीचा महाजन यांनी पुरता पंचनामा केला आहे.
सायकलचा वेगही मर्यादा ओलांडेल
या रस्त्यावरून मी सहजपणे सायकलवरूनही वेगमर्यादा ओलांडू शकतो. त्यामुळे येथील वेगमर्यादेच्या नियमांबाबत पुनर्विचार करावा. मात्र अशा पद्धतीने वाहतूक शाखेने इतर रस्त्यांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी मयूर महाजन यांनी केली.