नवीन वर्षात पुणे-मुंबई प्रवास होणार आणखी सुसाट

ठाणे खाडी पूल तीनच्या दुसऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण

मुंबई : नवीन वर्षात फेब्रुवारीपासून पुणे-मुंबई प्रवास आणखी सुसाट होणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

ठाणे खाडी पूल ओलांडून मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला येण्यासाठी दोन खाडी पूल सध्या सेवेत दाखल आहेत. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरून धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत ठाणे खाडी पूल-२ वरील वाहनांची संख्या अधिक असून या पुलावरील भार वाढत आहे. या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. तसेच वाहनांना कोंडीत अडकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल ३ चे काम हाती घेतले आहे. १.८३७ किमी लांबीच्या आणि ठाणे खाडी पूल-२ ला समांतर तीन-तीन मार्गिका असलेल्या या खाडी पूल ३ च्या प्रत्यक्ष कामाला २०२० मध्ये सुरुवात झाली.

याविषयी एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दक्षिणेकडील मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ उजाडणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ ही मार्गिका सेवेत दाखल करण्यात येईल. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुणे-नवी मुंबई, मुंबई प्रवास खाडी पूल ३ वरून करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आतापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम सुरू झाल्याबरोबर आलेले करोना काळ आणि तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला.