खासदार नरेश म्हस्के यांची मागणी
ठाणे: यंदाही सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, परंतु एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशा मागणीचे पत्र खासदार नरेश म्हस्के यांनी (27 फेब्रुवारी) महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.
या योजनातंर्गत शालेय शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्त, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, उदरनिर्वाहाकरिता, व्यवसायाकरिता, सहाय्यभूत साहित्याकरिता, वैद्यकीय उपचाराकरिता, बेरोजगारांना भत्ता, लग्नासाठी अर्थसहाय्य, 60 वर्षावरील दिव्यांगांना अर्थसहाय्य, बचतगट, आदी योजना दिव्यांगांसाठी राबविण्यात येतात. तर महिला व बालकल्याण योजनेतंर्गत विविध 13 योजना तर तृतीयापंथीयांसाठी योजना राबविल्या जात आहेत.
या योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतूदीपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतूदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निधीचे योग्य वाटप होणार नाही. कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार व जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनांतील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत. तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सर्व अर्जदारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी खासदार श्री. म्हस्के यांनी केली आहे.