सात महिलांची सुटका
ठाणे : घोडबंदर येथील अंत्यत गजबजलेल्या ठिकाणी ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करुन सात महिलांची सुटका केली आहे. तसेच दोन महिला आणि एक दलाल पुरुषाला अटक केली आहे.
कासारवडवली येथील एका संकुलालगत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ ‘अमारा वेलनेस अँड हिलनेस स्पा’ या नावाने मसाज केंद्र सुरु होते. यामध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षास मिळाली होती. या माहितीच्या आधारे, गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक एन.डी. क्षीरसागर, महिला पोलीस उपनिरीक्षक कदम, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी.के. वालगुडे, पोलीस हवालदार व्ही.आर. पाटील, के.बी. पाटील, आर. यु. सुवारे, महिला पोलीस अमलदार पी.जी. खरात, एच.आर. थोरात, के.एम. चांदेकर, यु.एम. घाडगे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला.
पथकाने गुरुवारी ‘स्पा’जवळ सापळा रचून दोन महिला आणि एक पुरुष दलालास ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. या प्रकरणात पोलिसांनी सात महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही महिला दलाल आणि पुरुषाला अटक केली आहे.