ठाण्यात एमसीएचआयचे १६ फेब्रुवारीपासून प्रॉपर्टी प्रदर्शन

ठाणे : घर खरेदीस इच्छुक नागरीकांचे लक्ष लागून राहिलेले क्रेडाई एमसीएचआय प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शन ठाण्याच्या रेमड मैदानावर १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत भरविण्यात येणार असून त्याचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शनाचे हे २१वे वर्ष असून या प्रदर्शनात ठाणे शहरातील १००पेक्षा जास्त गृहप्रकल्प आणि ५०हून अधिक बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाला येणाऱ्या ग्राहकांसाठी मोफत प्रवासाची सोय केली असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याचे श्री.मेहता म्हणाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून घर घेणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार घरे उपलब्ध होणार आहेत. येथे शहराच्या विविध भागातील परवडणाऱ्या घरापासून सर्व सुविधायुक्त प्रशस्त आणि उच्च प्रतीची जीवनशैली असलेली घरे देखिल मिळणार आहेत. ग्राहकांना सुरक्षित आणि माफक दरात गृह कर्जाद्वारे घर खरेदी करण्यासाठी विविध पर्याय देखिल प्रदर्शनात उपलब्ध असल्याचे श्री. मेहता म्हणाले.

१६ फेब्रुवारीला प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि बांधकाम व्यावसायिक गौतम सिंघानिया या वेळी उपस्थित राहणार असल्याचे श्री.मेहता म्हणाले.

या प्रदर्शनात महारेरा या विषयावर अश्वीन शाह यांचे १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता व्याख्यान होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी मिस आणि मिसेस ठाणे हा फॅशन शो देखिल होणार आहे. ठाणे शहराचा पुनर्विकास विकास या विषयावर १८ फेब्रुवारी रोजी परिसंवाद होणार असून त्या करिता 500 जणांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे श्री. मेहता म्हणाले. या परिसंवादामध्ये वास्तुविशारद मकरंद तोरस्कर, मकरंद पारंगे, ॲड. प्रसन्न माटे आणि जिल्हा गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना आभासी पद्धतीने ठाणे शहराची हेलिकॉप्टरने सैर घडवून आणली जाणार आहे, अशी माहित श्री.मेहता यांनी दिली. यावेळी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदिप महेश्वरी, सचिन मीराणी मनिष खंडेलवाल, गौरव शर्मा, राहुल व्होरा जय व्होरा आदी उपस्थित होते.