मालमत्ता जप्त, नळजोडण्या खंडित

ठाणे महापालिकेची थकबाकीदारांवर कठोर कारवाई

ठाणे : मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकवणाऱ्या नागरिक आणि आस्थापनांवर कठोर कारवाईचा बडगा ठाणे महापालिकेने उगारला असून आज आर मॉलला जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्टानुसार मालमत्ता आणि पाणीपुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्यावतीने वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे अखेरीस ज्या मिळकतधारकांनी मालमत्ता कराची थकीत व चालू रक्कम अद्यापही महापालिकेस भरलेली नाही अशा मिळकतधारकांच्या मिळकतीवर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक, कर निरीक्षक व कर विभागाचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली.

यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील ब्लॉक क्र. ९७ मधील सॅम्युल नाडर यांची फरसाण फॅक्टरी, जितेंद्र पाटील यांचे पाच अनिवासी मिळकती (गाळे), महावीर कल्पवृक्ष (क्लब हाऊस ) या मिळकतीची एकूण २६ लाख रुपये थकबाकी असल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. आर मॉल घोडबंदर रोड या मिळकतीचा एक कोटी ३८ लाखांचा मालमत्ता कर थकीत असल्याने या मॉलचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. आर मॉलला वॉरंट जप्तीची नोटीसही बजावण्यात आलेली आहे.

प्रभाग समितीमधील ब्लॉक क्र. १०५ मधील चार मिळकतींची मालमत्ता कराची एकूण रक्कम १३ लाख ६३ हजार रुपये थकीत रक्कम असल्याने, १४ मार्च, २०२२ रोजी या मिळकतींचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता, परंतु लिलावप्रक्रियेपुर्वीच संबंधीत चारही थकबाकीधारकांनी कराची संपूर्ण रक्कम महापालिकेस जमा केलेली आहे.