ठाण्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

ठाणे : मागील १५ दिवस सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला होता. बाईक रॅली, पदयात्रा, मॉर्निंग वॉक आणि दारोदारी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला होता. अखेर या प्रचाराला आज सोमवारी ब्रेक लागला आहे. आता पुढील दोन दिवस म्हणजे रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते डोळ्यांत तेल घालून मतदारसंघावर नजर ठेवून असणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ असून त्यातील ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे संजय केळकर, उध्दव सेनेचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तिकडे कोपरी पाचपाखाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव सेनेचे केदार दिघे, ओवळा माजिवडामध्ये शिंदे सेनेचे प्रताप सरनाईक, उध्दव सेनेचे नरेश मणेरा आणि मनसेचे संदीप पांचगे तर मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यात थेट लढत होत आहे.

आजवर झालेल्या प्रचारात मागील झालेला आणि न झालेला विकास यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात होते. महाविकास आघाडीच्या काळात विकास कामे कशी रोखली गेली, ती महायुतीच्या कार्यकाळात कशी सुरु झाली याचा पाढा महायुती आणि महाविकास आघाडीकडून वाचला गेला. त्यातही संविधान आणि अल्पसंख्यांचा विषय देखील चर्चेचा विषय ठरला.

महायुतीच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्या मेळाव्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात विकास कामांना कसा ब्रेक लावला गेला याचा पाढा वाचला. अजित पवार यांनी मुंब्य्रात मुल्ला यांच्यासाठी थेट हिंदीतून भाषण केले. त्यातही उर्दू वाक्यांचा देखील त्यांनी आवर्जुन उल्लेख केल्याने याचीही चर्चा झाली. दुसरीकडे आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्ष प्रमुख शरद पवार यांनीच हजेरी लावली होती. भाजपकडून केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री गजेंद्रसिहं शेखावत, केंद्रीय हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहाळ यांच्यासह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील ठाण्यात हजेरी लावली होती. या नेत्यांकडूनही महाविकास आघाडीचा तसेच राहुल गांधी यांचा समाचार घेण्यात आला.

दुसरीकडे ठाण्यात मनसेचे उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी दोन सभा घेतल्या. पहिल्या सभेपेक्षा दुसऱ्या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केल्याचे दिसून आले. कित्येक वर्षे तेच तेच चेहरे पाहण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन करतांनाच माझ्या हातात सत्ता द्या ४८ तासात मशिदीवरील भोंगे काढून दाखवतो असा पुनरच्चारही त्यांनी केला. त्यामुळे त्यांची ही सभा वादळी ठरली. तर उध्दव सेनेकडून ठाण्यात फक्त एकच सभा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची झाली. या सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर आगपाखड केल्याचे दिसून आले.
त्यात प्रचार रॅली, बाईक रॅली, पायी रॅली, चौक सभा आणि सभांच्या माध्यमातून मागील १५ दिवस प्रचाराचा धुराळा उडाल्याचे दिसून आले. सोमवारी सांयकाळी ६ नंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्याचे दिसून आले.