ठाणे शहरात १३५७ फेरीवाले
ठाणे : रखडलेल्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला चालना मिळाली आहे. धोरणाची अंमलबजावणी करताना आलेल्या हरकती आणि सूचनाही निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यानंतर १३६७ फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. असे असले तरी धोरणाच्या अंमलबजावणीप्रमाणे फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार कि नाही याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे.
फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करून त्याच ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसाय करणे अपेक्षित आहे, मात्र ठाण्यात रेल्वे स्टेशन, रुग्णालये, शाळा अशा अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे बस्तान मांडले आहे. हे फेरीवाले केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर ठाण्याच्या बाहेरील कुर्ला, भिवंडी या ठिकाणचे असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून व्यवसाय करत आहेत. २०१९ मध्ये ठाणे महापालिकेने सहा हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता.
आता फेरीवाला धोरण अंतिम करताना हा आकडा १२३० च्या घरात आला आहे. या फेरीवाल्यांची पहिली यादी पालिकेने जाहीर केली आहे. या यादीत नावात किंवा इतर काही बदल असतील तर ते १२ ऑगस्टपर्यंत करुन घेण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानुसार आतापर्यंत पालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत 38 हरकती सुचना प्राप्त झाल्या असून त्या निकाली काढण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेने शहरातील ६३६२ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते त्यातील १२३४ फेरीवाले अंतिम करण्यात आले आहेत. परंतु सर्वेक्षण सुरु असल्याने त्यात वाढ होऊन ही संख्या आता १३६७ एवढी झाली आहे.
ज्या सुचना-हरकती आल्या होत्या, त्या कोणत्या स्वरुपाच्या होत्या, त्या कशा स्विकारल्या गेल्या याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर ही यादी अंतिम होणार आहे. त्यानंतर फेरीवाल्यांच्या कमिटीची बैठक घेतली जाणार आहे. त्यातून फेरीवाला समितीची स्थापना केली जाणार आहे. यासाठी निवडणुक घेतली जाणार असून त्यानंतर फेरीवाला धोरण अंतिम केले जाणार आहे.