रिगल क्रिकेट क्लबची आगेकूच

ठाणे : रिगल क्रिकेट क्लबने स्पोर्टिंग यूनियन क्लबचा सहा गडी राखून पराभव करत डॉ.राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती मर्यादित ४० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.

स्पोर्टिंग यूनियन क्लबच्या १५३ धावांचे लक्ष्य रिगल क्रिकेट क्लबने २६.४ षटकात चार फलंदाजांच्या मोबदल्यात १५४ धावा करत पार केले. अष्टपैलू कामगिरी करणारी रिगल क्रिकेट क्लबची चेतना बिष्ट सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. स्पोर्टिंग यूनियन क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. फलंदाजांनी धावा कमी करूनही स्वैर चेंडूवर आणि दंड स्वरूपात मिळालेल्या धावांमुळे स्पोर्टिंग यूनियन क्लबच्या खात्यात दीड शतकी धावसंख्या जमा झाली. रिगल क्रिकेट क्लबच्या गोलदाजांनी सुमारे ६० अवांतर धावा दिल्या. याशिवाय षटकांची गती कमी राखल्याने त्यांना १३ धावांचा दंड पत्करावा लागला. स्पोर्टिंग यूनियन क्लबकडून मानसी चव्हाणने २४ आणि दिपाली शेलारने नाबाद १४ धावा बनवल्या. चेतना बिष्ट, वैष्णवी अय्यंगार, कोमल जाधव, गौरी कदम आणि प्रियदर्शनी सिंगने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

उत्तरादाखल रिगल क्रिकेट क्लबच्या आघाडीच्या फलंदाजांनी छोट्या पण महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.चेतना बिष्टने ३६, जेटजून ची ने नाबाद ३५, आकांक्षा मिश्राने ३२ आणि हर्षल जाधवने २७ धावांचे योगदान दिले. मानसी चव्हाणने दोन, निधी सावंत आणि पहल पोपटने प्रत्येकी एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक
स्पोर्टिंग यूनियन क्लब : ३९ षटकात ७ बाद १५३( मानसी चव्हाण २४, दिपाली शेलार नाबाद १४, चेतना बिष्ट ८-३-९-१, वैष्णवी अय्यंगार ३-२१-१, कोमल जाधव ८-३५-१, गौरी कदम ५-११-१, प्रियदर्शनी सिंग ५-१-१०-१) ६ विकेट्सनी पराभूत विरुद्ध रिगल क्रिकेट क्लब : २६.४ षटकात ४ बाद १५४ (चेतना बिष्ट ३६, जेटसून ची नाबाद ३५, हर्षल जाधव २७, आकांक्षा मिश्रा ३२, मानसी चव्हाण ८-२-३०-२, निधी सावंत ४-२२-१, पहल पोपट ०.४-३-१). सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू : चेतना बिष्ट.