ठाण्याची शोभायात्रा; प्रबोधनाचे चित्ररथ

सांस्कृतिक नगरीत नववर्षाचे थाटात स्वागत

ठाणे : घराघरात रांगोळ्या, गुढ्या तोरणे बांधून ठाणेकरांनी हिंदू नववर्षाचे स्वागत करतानाच पारंपारिक वेशभूषा, सामाजिक प्रबोधन करणारे चित्ररथ, विविध कला पथके, लेझीम, ढोल पथके अशा श्रीमंत थाटात निघालेल्या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास समितीचे शोभायात्रेचे यंदाचे २५वे वर्ष होते.
शिक्षण, आरोग्य, घनकचरा व पाणीपुरवठा विभागाचे चित्ररथ पाहायला मिळाले. घनकचरा विभागाच्या चित्ररथात ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात जनजागृती करणारे गीत यावेळी सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेचा यंदा पहिल्यांदाच चित्ररथ यात्रेत सहभागी झाला होता. त्यावर विविध योजनांची माहिती देण्यात आल्याने या चित्ररथाने सर्वसामान्यांचे लक्ष वेधले. टीजेएसबी बँकेच्यावतीने साकारण्यात आलेल्या बाराखडी आणि मुळाक्षरांचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध दाखविणारा चित्ररथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच घंटाळी मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या चित्ररथात योगाचे महत्त्व सांगण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज, राधाकृष्ण, विठ्ठल, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये लहान मुले दिसून आली. पारंपारिक वेषभूषा परिधान करून महिला मोठ्या संख्येने बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्य चौकात काही सामाजिक संस्थांकडून पालखी आणि रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. तसेच काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थांच्या माध्यमातून मंच उभारले होते.

राज्यात समृद्धीची गुढी-एकनाथ शिंदे या यात्रेची सुरुवात श्री कौपिनेश्वर मंदिरापासून सकाळी सात वाजता करण्यात आली. पुढे मासुंदा तलाव, रंगो बापूजी चौक ते दगडी शाळा या मार्गाने ती निघाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्वागताध्यक्ष शरद गांगल, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आयुक्त सौरभ राव, माजी आमदार रवींद्र फाटक, न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉ. अश्विनी बापट यांच्या उपस्थितीत कौपिनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी शहरातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वागतयात्रेत ६० हून अधिक संस्था यंदा सहभागी झाल्या होत्या. राजस्थानी, दाक्षिणात्य, शीख, पारसी, जैन अशा विविध प्रांतातील ठाणेकर नागरिक पारंपारिक वेशभूषेत यात्रेत सहभागी झाले होते. समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने गुड अँड बॅड टचचे महत्त्व लहान मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता. मनशक्ती केंद्राच्या वतीने ‘मुलांना परीक्षेची भीती का वाटते’ यांसारखे विविध प्रश्न चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आले. ठाणे महापालिकेच्या राज्यात तीन महिन्यांपूर्वी सरकारने विजयाची गुढी उभारली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रात विकासाची गुढी, समृद्धीची गुढी, लाडक्या बहिणी, शेतकऱ्यांची अशी ही समृद्धी आणि संकल्पनेची गुढी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केले. राज्यासाठी विकासाचे पर्व आणले असून त्याला वेगाने पुढे न्यायचे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.