भाजप युवा मोर्चाने केले आंदोलन
ठाणे : मुंबई विद्यापीठाचे ठाण्यात असलेले उपकेंद्र समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या विरोधात सोमवारी भाजप युवा मोर्चाच्या वतीने आणि विद्यार्थ्यांनी आंदोलम केले. दोन दिवसात येथील सोयी-सुविधा पू झाल्या नाहीत, तर या उपकेंद्राला टाळे ठोकले जाईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
ठाण्यातील हायलँड पार्क येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या वरीष्ठांशी संपर्क साधला होता. पत्रव्यवहारही केला होता, परंतु दोन महिन्यानंतरही त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने अखेर सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उपकेंद्रात शिक्षण घेणाऱ्या सुमारे २०० च्या आसपास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
याठिकाणी मागील दोन महिन्यांपासून पाण्याची सुविधा नाही, वॉशरुमची अवस्था दयनीय झाली आहे, छताचे प्लास्टर पडत आहे, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सहा शिक्षक आवश्यक असतांना केवळ एकच शिक्षक येथे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचा मुंबईचा फेरा वाचावा या उद्देशाने ठाण्यातच अशा विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्र उभारण्यात आले असून त्याठिकाणी काही विषय शिकविले जात आहेत. परंतु असे असतांना या ठिकाणी सुविधांची वानवा असावी हे अयोग्य असल्याचे मत युवा मोर्चाने यावेळी व्यक्त केले.