भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या यंदाच्या पर्वाची दमदार सुरुवात करताना मंगळवारी सलामीच्या लढतीत फ्रान्सवर ५-० असा शानदार विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या, तर फ्रान्स १२व्या स्थानावर आहे. परंतु तरीही फ्रान्सचा संघ भारताला झुंज देईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र, मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारताने धारदार आक्रमण करतानाच भक्कम बचाव करत सलामीची लढत पाच गोलच्या फरकाने जिंकली. भारताकडून उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (२१वे मिनिट), वरुण कुमार (२४वे मि.), शमशेर सिंग (२८वे मि.), मनदीप सिंग (३२वे मि.) आणि आकाशदीप सिंग (४१वे मि.) यांनी गोल झळकावले.
भारतीय संघ बुधवारी पुन्हा मैदानात उतरणार असून त्यांची यजमान दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल. त्यानंतर शनिवारी (१२ फेब्रुवारी) पुन्हा भारत आणि फ्रान्स हे संघ आमनेसामने येतील.