धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना शस्त्राच्या धाकाने लुटणारा जेरबंद

कसारा : पनवेल-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणा-या तीन लुटारुंपैकी एकाला जेरबंद करण्यात कसारा रेल्वे सुरक्षा बल आणि जीआरपी जवानांना यश आल्याची माहिती सहायक उपनिरीक्षक प्रमोद सांगळे यांनी कळविले आहे.

मंगळवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी कल्याणहून सुटलेल्या गोरखपूर एक्सप्रेसमध्ये तिघा शस्त्रधारी गुंडांनी प्रवाशांना दमदाटी करीत लुटण्याचा प्रकार केला. दरम्यान कसारा स्टेशन येण्याआधी सिग्नलजवळ प्रवाशांनी अलार्म चेन ओढून आरडाओरडा केला. सुरक्षा रक्षकांना माहिती मिळताच त्यांनी पलायन करणाऱ्या या गुंडांचा पाठलाग केला. यावेळी एकाच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले असले तरी दोघे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.

सापडलेल्या गुंडाकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि कैचीपासून बनवलेली दोन धारधार हत्यारे मिळाली. आकाश श्रीवंत (29) असे अटक आरोपीचे नाव असून कसारा रेल्वे स्थानकावर गस्त घालणारे रेसुब कर्मचारी रविंद्र गोसावी, श्री. कचवे यांनी आरोपीस जेरबंद केल्याचे वृत्त आहे.