पंतप्रधान मोदी ठाण्यात येणार !

१६ ऑक्टोबर रोजी कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण

ठाणे : जिल्ह्यातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १६ ऑक्टोबर रोजी ठाण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला सुमारे एक लाख ठाणेकर उपस्थित राहणार असल्याने आज प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली.

ठाणे महापालिका, जितो आणि टाटा मेमोरिअल यांच्या संयुक्तपणे बाळकुम येथील ग्लोबल रुग्णालयाचे कर्करोग रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेने ग्लोबल रुग्णालयाची इमारत कर्करोग रुग्णांसाठी दिली असून या रुग्णालयाचे व्यवस्थापन टाटा मेमोरिअल कॅन्सर आणि ठाण्यातील जितो रुग्णालय करणार आहे सुमारे ११०० बेडची या रुग्णालयात रुग्णाकरिता व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कर्करोग रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून इलाज केला जाणार आहे.

१६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार आहेत. हे रुग्णालय भविष्यात कमी पडू नये यासाठी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या सुविधा भूखंडावर आणखी एक इमारत निर्माण केली जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात त्यांचे विचार मांडणार आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाला सुमारे एक लाख नागरिक उपस्थित राहण्याचे शक्यता असल्याने कायदा आणि सुव्यवस्था तसेच पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज एसपीजी, ठाणे महापालिका अधिकारी, ठाणे पोलीस अधिकारी यांनी ग्लोबल रुग्णालय परिसराची पाहणी केली. त्या ठिकाणी एकाच ठिकाणी एक लाख नागरिक बसू शकत नसल्याने दोन भूखंडांवर नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्याची सूचना यावेळी पोलीस अधिकारी आणि पंतप्रधान यांच्या विशेष सुरक्षा पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.