टोमॅटोसह भाज्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी घसरले

नवी मुंबई: मागील एक ते दीड महिन्यापासून किरकोळ बाजारात १६० ते २०० रू दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. त्यासोबतच बाजारात आवक वाढल्याने वाटाणा, हिरवी मिरची आणि शिमला मिरचीच्या दरात १५ ते २०टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे गृहिणींना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

वाशीतील एपीएमसी घाऊक भाजी बाजारात भाज्यांची आवक वाढली असून दर उतरले आहेत. शुक्रवारी बाजारात ६६१ आणि मिक्स १२५ अशा ७८६ गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे आवक वाढल्याने वाटाणा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि शिमला मिरचीच्या दरात १५ते २०टक्के घसरण झाली आहे.

गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ९५ ते ११० रुपयांवर गेले होते. तर किरकोळ बाजारात १६० ते २०० रुपयांनी विकले गेले होते. मात्र एपीएमसी बाजारात टोमॅटोच्या दरात २० रुपयांनी घसरण झाली असून आता प्रतिकिलो ८० ते ९० रुपयांवर उतरले आहेत. किरकोळ बाजारात १४० ते १८० रुपये दर झाले आहेत.

शुक्रवारी एपीएमसीत १३९५ क्विंटल टोमॅटो आवक झाली आहे. वाटाणा १५७१ क्विंटल, हिरवी मिरची १५८८ क्विंटल आणि शिमला मिरची ५८८ क्विंटल आवक झाली होती.

घाऊक बाजारात २५ ते ३०टक्के आवक वाढली आहे. घाऊक बाजारात वाटाणा, हिरवी मिरची, टॉमेटो, शिमला मिरची आवक वाढली आहे. वाटाणा आधी ८० ते १२० रुपये किलोने उपलब्ध असलेला आता ६०-६५ रुपये, हिरवी मिरची ५०-५५ रुपयांवरून ३५-४०रुपये, शिमला मिरची ५०-६० रुपयांवरून ३५-४० रुपये तर टोमॅटो १२०-१३० रुपयांवरून आता १००-११०रुपयांवर उपलब्ध आहेत.

भाज्यांचे दर आवाक्याच्या बाहेर गेले होते, त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले होते, मात्र आता भाज्यांचे दर उतरले असल्याने गृहिणींना दिलासा मिळत आहे.

भाज्या आता आधी
वाटाणा ६०-६५ ८०-१२०
हिरवी मिरची ३५-४० ५०-५५
शिमला मिरची ३५-४० ५०-६०
टोमॅटो ८० -९० १००-११०