भिवंडी: भिवंडी शहरातील नागरिकांच्या पसंतीच्या वऱ्हाळदेवी तलावाचा कायापालट करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तलावाच्या पुनर्विकास व सुशोभिकरणासाठी सुमारे ५३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्याच्या पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे. तर केंद्र सरकारची लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
भिवंडी शहरातील नागरिकांसाठी वऱ्हाळदेवी तलाव हा विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या भोवती सकाळी मॉर्निंग वॉकसाठी व सायंकाळी लहान मुले, महिला व नागरिकांची विरंगुळ्यासाठी गर्दी होत असते. मात्र, काही वर्षांपासून तलावाचे सुशोभिकरण झाले नव्हते. त्यात तलावाच्या संरक्षक भिंती तुटल्यामुळे तेथून सांडपाणीही तलावात येत होते. या परिस्थितीची माहिती मिळाल्यावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तलावाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या तलावाचे ५३ कोटी रुपये खर्चून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या तलावाभोवती संरक्षक भिंतही बांधली जाणार असून, गाळ काढला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आदेशानंतर भिवंडी महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या सुकाणू समितीने ४ ऑगस्ट रोजी मान्यता दिली. तो राष्ट्रीय सरोवर योजनेंतर्गत केंद्र सरकारकडे पाठविण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.