खराब हवामान असताना हट्टाने उडवले हॅलिकॉप्टर?

आव्हाडांकडून मुख्यमंत्र्यांना मैत्रीचा सल्ला

ठाणे: हवामान खराब असल्याने हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणत असताना देखील काल आपण हट्टाने पायलटला हॅलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. असे पुन्हा कधी करू नका, असा मैत्रीचा सल्ला आ.जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटद्वारे दिला.

आमच्यात मतभेद असले तरी ते राजकीय मतभेद आहेत. पण हवामान खराब असतांना कधीही हॅलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत. आपण हॅलिकॉप्टर साताऱ्याला उतरवत नंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही. आपण हे का केलेत ते मला माहित नाही. हे अस करणे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि वैयक्तिकदृष्ट्या चुकीचे आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. “सर सलामत तो पगडी पचास” अशी एक म्हण प्रचलित आहे. आपण अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही. कारण कोणी काहीही म्हणो, आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधिही करू नका. असे ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आवर्जून शेवटी म्हटले आहे.