लाल मिरचीचे दर ५० टक्क्यांनी घसरले!

घरगुती मसाला बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू

नवी मुंबई : मागील वर्षी लाल मिरचीचे दर प्रचंड वाढले होते. यंदा मात्र घाऊक बाजारात दरात निम्म्याने घट झाल्याने यंदा लाल मिरचीचे तसेच काही मसाल्यांचे दर ५० टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे होळीचा सण सरताच महिलांची घरगुती मसाला बनविण्यासाठी तसेच लाल मिरची, त्यासाठी लागणारे मसाल्याचे जिन्नस घेण्यास लगबग सुरू केली आहे.

वाशीतील एपीएमसी बाजारात मार्च महिनाअखेर तसेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लाल मिरची, गरम मसाले जिन्नस खरेदीला लगबग सुरू होते. मार्च महिन्यापासून एपीएमसी मसाला बाजारात कर्नाटक, बंगळुरू, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात लाल मिरची दाखल होण्यास सुरुवात होते. एपीएमसीमध्ये एक हजार ते दीड हजार क्विंटल लाल मिरची दाखल होत आहे. लाल मिरचीमधील पांडी, लवंगी, बेडगी, काश्मिरी, शंकेश्वरी यांची आवक होते. यामध्ये महिला लवंगी, काश्मिरी, बेगडी, शंकेश्वरी मिरचीला अधिक पसंती देतात.

महिला वर्षभराचा मसाला एकदाच करून ठेवत असल्याने प्रत्येक जण कमीत कमी चार किलो ते जास्तीत जास्त आठ किलोपर्यंत मसाला बनवून ठेवतात. काही महिला मिरची स्वस्त दरात मिळावी याकरीता गट करून मिरची खरेदी करतात. मसाला बनविण्यासाठी लाल मिरचीबरोबर लागणाऱ्या काही गरम मसाल्यातील जिन्नसांचे दर देखील उतरले आहेत. यावर्षी आवक वाढून देखील मागणी नसल्याने दर उतरले आहेत, अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे.

मिरची प्रकार घाऊक दर
आता आधी
लवंगी १४०-१७० २५०-२७०
बेडगी १५०-२५० ४५०
काश्मिरी २५०-३५० ७५०-८००
जिरा. २५० ७०० ७५०
हळद. १३० १४० १८०- २२०