पाणी वाचविण्यासाठी गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारण्यापेक्षा
शरद पवार गटाकडून ठामपाकडे मागणी
ठाणे : शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर तोडगा म्हणून सर्व्हीस सेंटर्स बंद करण्याचे आदेश ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व्हीस सेंटरवर काम करणाऱ्या मुलांची उपासमार होणार आहे. सर्व्हीस सेंटर बंद करण्याऐवजी पाण्याचा प्रचंड उपसा करणारी अनधिकृत बांधकामे रोखावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केली आहे.
राज्यभर सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने अघोषित पाणीकपात करण्यात आली आहे. तसेच, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वाहने धुणारी सर्व्हीस सेंटर बंद करण्याचे आदेश ठाणे महानगर पालिकेने दिले आहेत. या संदर्भात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास देसाई यांनी ठामपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
भविष्यात ठाणे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये व जलसाठा कमी होत असल्याने उपाययोजना म्हणून निर्बंध घातले जात आहेत. या निर्बंधांमध्ये गोरगरीब लोक चिरडले जात आहेत. हातावर पोट असणाऱ्या घटकाची उपासमार होणार आहे. सर्व्हीस सेंटरवर काम करणारे लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्या रोजगाराची चिंता न करता, ठामपाने हे आदेश जारी केले आहेत. मात्र, ज्या बांधकामांना सर्वाधिक पाणी लागते, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दुसरीकडे पन्नास मजल्यांच्या इमारतीला मंजुरी दिली जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. म्हणूनच सर्वच बांधकामे बंद करावीत, अशी मागणी श्री.देसाई यांनी केली आहे.