ठाण्यासाठी मनसेचीही तयारी; महायुतीत कोण ठरणार भारी?

ठाणे : ठाणे विधानसभा मतदारसंघ गेली दहा वर्षे भाजपकडे असताना या जागेसाठी शिवसेना शिंदे गटापाठोपाठ मनसेने देखील तयारी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. मात्र मनसेच्या धरसोडपणामुळे या निर्णयाबाबत खात्री देता येत नसून मनसेचे स्थानिक पदाधिकारी देखील या वृत्तास दुजोरा देत नसल्याचे कळते.

गेली दहा वर्षे भाजपचे आमदार संजय केळकर हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करत आहेत. महायुती असताना देखील या मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर भाजपला लोकसभा निवडणुकीत विनाशर्थ पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या मतदार संघासाठी तयारी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

२००९ आणि २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला या मतदारसंघातून दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला आणि भाजपचा वरचष्मा असलेल्या ठाणे विधानसभा मतदारसंघात मनसेची ताकद २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपले नशीब आजमवण्यास मनसे मैदानात उतरली तर महायुतीच्या ढवळलेल्या राजकारणात आणखी एक मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ मध्ये भाजपला युती असतानाही एकसंघ शिवसेनेकडून रसद न मिळता ती छुप्या पद्धतीने मनसेला झाल्याची उघड उघड चर्चा होती. अशा स्थितीतही भाजपचे संजय केळकर हे ठाणे मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले होते. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मतदार दोन गटात विभागले जाऊनही ठाणे शहर मतदार संघातील भाजपची पूर्ण ताकद शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मिळाली, त्यामुळे नरेश म्हस्के खासदार म्हणून निवडून आले. अशावेळी शिंदे गटाने ठाणे विधानसभा मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. एकूणच भाजपाच्या मतदारसंघासाठी शिंदे गट आणि मनसेने तयारी सुरू केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच स्वबळाचा नारा देत २०० पेक्षा अधिक जागा लढवण्याचे सुतोवाच केले आहे. यामध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असल्याचे समजते. मनसेने केलेल्या सर्वेक्षणात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ अनुकूल असल्याचे मत अहवालात असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदासंघात २००९ ते २०१९ पर्यंत झालेल्या निवडणुकीचा आढावा घेतला असता ठाण्यात शिवसेना, भाजपच्या जोडीला मनसेची ताकदही कायम असल्याचे दिसते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंघ असलेल्या शिवसेनेचे राजन विचारे ५१ हजार मतांनी निवडून आले होते. तर मनसेचे राजन राजे यांना ४८ हजार ५६९ मते मिळाली होती. अवघ्या अडीच हजार मतांनी मनसेचा येथे पराभव झाला होता. अर्थात त्यावेळी शिवसेना-भाजप अशी युती असतानाही मनसेने चांगली मते या मतदारसंघातून मिळवली होती. २०१४ साली शिवसेना-भाजप युती तुटली. त्याचा फटका शिवसेनेला बसला आणि रविंद्र फाटक यांच्या रुपाने शिवसेनेला पहिल्यांदा या मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे संजय केळकर हे आमदार झाले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे असे सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर तर मनसेची थेट पाचव्या क्रमांकावर घसरण झाली.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेना- भाजपची पुन्हा युती झाली. युतीधर्म म्हणून भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा संधी मिळाली. त्यांच्यासमोर कोणतेच तगडे आव्हान नसल्याचे दिसत असतानाच भाजपच्या संजय केळकर यांना ९२ हजार २९८ इतकी मते तर मनसेचे अविनाश जाधव यांना ७२ हजार ८७४ मते मिळाली. भाजप- शिवसेना युतीला ५१ तर स्वबळावर लढणार्‍या मनसेला ४० टक्क्याहून अधिक मते मिळाली. यावेळीही शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथील मराठी मतदाराची साथ मनसेला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मनसेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपला शिलेदार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे.

सध्यातरी ठाणे विधानसभा मतदासंघावर मनसेने दावा ठोकला आहे. अविनाश जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यताही बळावली आहे. त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघात कामाला सुरुवातही केली आहे. पण मनसेने सध्या स्वबळाचा नारा दिला असला तरी ते महायुतीचे घटक बनतील की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. तसेच कोकण पदवीधर मतदारसंघसाठी उमेदवार जाहिर केल्यानंतर बिनशर्त पाठिंबा देत अभिजित पानसे यांच्यावर माघार घेण्याची वेळ ओढावली होती. राज ठाकरे यांची सततची बदलती भूमिका आणि स्थानिक राजकारणामुळे २००९ आणि २०१९ चा करिष्मा मनसे कायम ठेवणार की २०१४ प्रमाणे बॅकफूटवर जाणार हे पहावे लागेल.

२००९ विधानसभा निवडणूक
शिवसेना- ५१०१० मते (३२.२२ टक्के)
मनसे- ४८५६९ मते (३०.६९ टक्के)
काँग्रेस- ३६२८८ मते (२२.९२ टक्के)

२०१४ विधानसभा निवडणूक
भाजप- ७०८८४ मते (३८.८६ टक्के)
शिवसेना- ५८२९६ मते (३१.९६ टक्के)
राष्ट्रवादी- २४३२० मते (१३.३३ टक्के)
काँग्रेस- १५८८३ मते (८.७१ टक्के)
मन्ासे- ८,३८१ मते (४.६ टक्के)

२०१९ विधानसभा निवडणूक
भाजप- ९२२९८ मते (५१.७८ टक्के)
मनसे- ७२८७४ मते (४०.८८ टक्के)
नोटा- ५५४७ (३.११)