प्रभाग आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग
अंबरनाथ : कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रभाग रचना, त्यावरील हरकती आणि त्यांची सुनावणी होत नाही तोच प्रभाग आरक्षण सोडत प्रकिया पूर्ण झाली. पालिकेत प्रथमच पॅनल पध्दतीने निवडणुका होणार आहेत. यासाठी झालेल्या आरक्षण सोडतीचे राजकीय वर्तुळात स्वागत केले आहे. जाहीर प्रभाग रचनेवरूनही विजय आमचाच होणार असल्याचे दावे शिवसेना आणि भाजपने केले आहेत.
नवीन प्रभाग रचनेत अनुसूचित जाती आणि जमातींचे प्रभाग निश्चित करून त्या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. इतर ठिकाणी एक महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण असल्याने बहुतेक नगरसेवकांना वातावरण पोषक असल्याचे दिसून येते. नवीन प्रभाग रचनेचा कोणताही फटका बसणार नाही. वातावरण पोषक असून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे.
मर्यादित क्षेत्रात काम करण्याची सवय भाजपला नसल्याने नवीन प्रभाग रचना फायदेशीर अशीच आहे. प्रभाग रचना करणे हा त्या-त्या सरकारचा पसंतीचा प्रश्न आहे. प्रभाग २२ मध्ये विद्यमान नगरसेवकाच्या विकासकामाचा एकमेकांना फायदा होईल. २२ अ महिलांसाठी राखीव असलेल्या ठिकाणी विद्यमान माजी नगरसेविका अनिता आदक तर ‘ब’ मधून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. शहरात भाजपची सत्ता येईल, असा दावा संजय आदक यांनी केला आहे.
मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनीही आरक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांचा प्रभाग देखील सुरक्षित असून, अपर्णा भोईर प्रभाग २२ अ मधून निवडणूक लढवणार असल्याचे शहराध्यक्ष भोईर यांनी सांगितले. प्रभागात १० वर्षांपासून विकास कामे केल्याचे त्यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, प्रज्ञा बनसोडे, सुनील चौधरी यांचेही प्रभाग सुरक्षित राहिले आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि युवा सेनेचे पदाधिकारी निखिल वाळेकर यांचा चार अ हा अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिलांसाठी आणि चार क मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे निखिल वाळेकर यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग चार हा एकच प्रभाग त्रिसदस्यीय असून महिला आरक्षण आहे. माजी उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि अब्दुल शेख यांचेही प्रभाग सुरक्षित आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची सत्ता हमखास येईल असा दावा शहर संघटक आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केला.
गेल्या दोन वर्षांपासून संपर्क कार्यालय उघडून नागरिकांच्या संपर्कात असलेले भाजपचे इच्छुक उमेदवार सर्जेराव माहुरकर यांचा प्रभाग २० खुल्या गटात असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. नगरपालिकेच्या सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.