नवी मुंबई: एपीएमसी बाजारात नवीन बटाटा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन बटाटा मोठ्या प्रमाणावर दाखल होत असल्याने बटाट्याच्या दरात घसरण झाली आहे. प्रतिकिलो १६ ते १८ रुपयांनी उपलब्ध असलेले बटाटे आता १० ते १२ रुपयांनी विक्री होत आहेत.
सुरुवातीला पाऊस लांबल्याने नवीन बटाट्याची लागवड एक महिना उशिरा करण्यात आली. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत बटाटा कमी दाखल होत असल्याने दर चढे होते. परंतु आता बाजारात आवक वाढली आहे. सध्या बाजारात उत्तर प्रदेश, इंदोर आणि तळेगाव येथून बटाटा दाखल होत असून ५७ गाड्या आवक झालेली आहे. जुना बटाटा गोडसर लागत असल्याने नवीन बटाट्याला मागणी आहे. नवीन बटाटा चवीला अधिक चांगला असल्याने त्याला नेहमीच बाजारात मागणी असते. उत्तर प्रदेश बटाटा प्रतिकिलो १०-१२ रुपये तर इंदोर बटाटा १५-१६ रुपयानी विक्री होत आहे.
एपीएमसीत शुक्रवारी बटाट्याची आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे. पुढील कालावधीत दर आणखीन कमी होण्याची शक्यता आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.