एपीएमसी बाजारात बटाटा वधारला

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी असले तरी बटाटा दरात मात्र वाढ झाली आहे. बटाट्याची आवक सध्या रोडावल्याने हा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

बाजारात मागील आठवड्यात प्रतिकिलो ८-१० रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता १३ ते १४ रुपयांवर विक्री होत असून ५ रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी जास्त असून आवक कमी झाल्याने दरवाढ होत आहे.

वाशीतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत सध्या बटाट्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे मागणी जास्त असल्याने दरवाढ झाली आहे. सध्या बाजारात बटाट्याच्या ३५-४० गाड्या दाखल झाल्या आहेत. आधी नवीन बटाटा दाखल होत होता मात्र आता कोल्ड स्टोरेजमधला बटाटा दाखल होत आहे. तसेच मागणी वाढली असून आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे.

कांदा-बटाटा बाजार समितीत सद्यस्थितीत गुजरात, मध्यप्रदेश, युपी या परराज्यातुन बटाट्याची आवक सुरू आहे. घाऊक बाजारात मंगळवारी ३०-३५ गाड्या आवक झाली. मागील आठवड्यात प्रतिकिलो ८-१० रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा १३-१४रुपये तर वेफर्स बटाटा १३-१४ रुपयांवरून १६-२० रुपयांवर गेला आहे. बाजारात आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाली आहे.