विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर हल्लाबोल
ठाणे: बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरणानंतर राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यात सापडल्यानंतर ठाणे पालिकेच्या आज पार पडलेल्या महासभेत त्याचे पडसाद उमटले.
शहरातील आयव्हीएफ, सोनोग्राफी सेंटर, बोगस डॉक्टर तसेच धर्मादाय रुग्णालयात रुग्णाची होणारी हेळसांड आदी विषयावर महासभेत जोरदार घमासान झाले. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल करत ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः पोस्टमॉर्टेम केले.
सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर पहिलाच विषय मानद डॉक्टर घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. प्रशासनाकडून प्रस्तावाचे वाचन करताच नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या गैरकारभारावर बोट ठेवले. ठाण्यातील आरोग्य यंत्रणेची महासभेत चिरफाड करत आरोग्य विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांचे ताशेरे ओढले. त्यावेळी शिंदे गटाचे नगरसेवक राजेश मोरे यांनी मानद डॉक्टरांच्या पॅनलसह आयव्हीएफ, सोनोग्राफी सेंटरबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यापाठोपाठ दिव्याचे नगरसेवक रमाकांत मढवी यांनीही हाच मुद्दा उपस्थित करत इतर राज्यातून अनेक डॉक्टर पदवी घेवून येतात आणि शहरात दवाखाने सुरू करत आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये दवाखाने थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. २०१२ पासून कोपरीतील लक्ष्मीचंद फतीचंद रुग्णालयाला २४ तास डॉक्टर नसल्याने प्रसूतिसाठी आलेल्या महिलांची हेळसांड होत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांनी केला. तसेच मुंब्रा येथे एनआयसी रुग्णालयात उद्धटनाच्या प्रतीक्षेत असून त्याचे उदघाटन कधी करणार ? असा सवाल नगरसेवक राजन केणी यांनी केला. दरम्यान, धर्मादाय रुग्णालये मोकाट असून त्यांची चौकशी कधी करणार असा सवाल अनेक महिला नगरसेवकांनी उपस्थित केला.
ठाणे पालिका क्षेत्रात ११ आयव्हीएफ केंद्र आहेत तर, २७ आयव्हीएफ केंद्र मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. उपसंचालक विभागाने त्यांना परवानगी दिली आहे. परंतु पुण्याच्या विभागीय कार्यालयाची त्यांना मान्यता मिळालेली नाही. बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणानंतर शहरातील आयव्हीएफ सेंटरची सहा पथकांमार्फत तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर, पालिका क्षेत्रातील २५९ सोनोग्राफी सेंटरला १० पथकांमार्फत अचानक भेटी देऊन त्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी दिली.
ठाणे शहरातील आरोग्य यंत्रणेची महासभेत चिरफाड झाल्यांनंतर आरोग्य यंत्रणेची भंबेरी उडाली. या आरोग्य विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांचे ताशेरे ओढत आरोग्य यंत्रणेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी बूस्टर दिला. शहरातील आयव्हीएफ, सोनोग्राफी सेंटर, बोगस डॉक्टर आदी विषयावर जोरदार घमासान झाले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कारवाईचे आदेश दिले. प्रभाग समितीनिहाय डॉक्टरांचे पथक नेमण्यात येईल. दवाखान्यांची तपासणी करण्यात येईल. तसेच बोगस डाॅक्टर आढळून आले तर, गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन माळवी यांनी दिले.