महासभेत पाणी तापले; अधिकाऱ्यांना घाम फुटला!
महापौरांचा कारवाईचा इशारा
ठाणे: ठाणे शहराला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले असतानाच पाणी समस्या सोडविण्याऐवजी गोलगोल उत्तरे देणाऱ्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करून कारवाई करण्याचा इशारा महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी दिला.
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज पाणी प्रश्न गाजला कळवा, मुंब्रा या भागातील सदस्यांबरोबच घोडबंदर भागातील पाणी टंचाईबाबत लोकप्रतिनिधींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अनेक भागांत पाणीपुरवठा केला जात नाही. वेळेवर पाणी मिळत नाही. मुंब्रा, कौसा, दिवा ग्रामिण भाग, कळवा या भागातील पाणी वितरण सेवा कोलमडल्याचा आरोप या भागातील नगरसेवकांनी केला. सुमारे पाच ते दहा लाखांची वस्ती असलेल्या मुंब्रा भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर त्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ एकच टँकर असल्याचे महासभेच्या निदर्शनास आणून देण्यात आले. कळवा, भास्कर नगर, पौड पाडा, वाघोबा नगर या भागातील जलकुंभ तयार असताना पाणी पुरवठा केला जात नसल्याचा आरोप करण्यात आला. या भागातील दोन जलकुंभाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
इंदिरा नगर भागातील संपचे काम देखिल कासव गतीने सुरु असल्याचा मुद्दा उपस्थिती करण्यात आला. दिवा-मुंब्रा भागाला पाणीपुरवठा करताना दोन वेगळ्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येणार असून रमजान महिना असल्याने या भागातील कामाला उशीर होत असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे उप नगरअभियंता विनोद पवार यांनी सांगितले. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे ते योग्य प्रकारे देत नसल्याने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी मागिल महिन्यात पाणी समस्येबाबत बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी टंचाई दूर करण्याचे आदेश दिले होते, परंतु कारवाई करण्यात आली नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. चार वर्ष अराम केलेल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करण्यास वेळ द्यावा, अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
या चर्चेत प्रमिला केणी, शिवसेनेच्या मालती पाटील, अनिता गौरी, चंद्रकांता साळवी, एकता भोईर, बाबाजी पाटील, राष्ट्रवादीच्या मार्जिया पठाण, सुधीर भगत, अभिजित पवार, एमआयएमच्या सहर शेख यांनी चर्चेत भाग घेतला.