अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील २४ तास महत्त्वाचे

जिल्ह्यातील धरणे ८० टक्क्यांहून अधिक भरली

ठाणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील २४ तासांत ठाणे शहरासह जिल्ह्यात मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे जवळपास ८० टक्के भरली असून शेतीला दिलासा मिळाला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रातील वारे कोकण किनारपट्टीच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पुढील २४ तासांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासून ठाणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. ठाणे महापालिका हद्दीत यंदा आतापर्यंत २,१०१ मिमी पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षी याच कालावधीत १,५७२ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा मागील वर्षीपेक्षा ५०० मिमीहून अधिक अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. सततचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे शहरातील शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे कोसळल्याच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून शेकडो वाहनांचे नुकसान झाले आहे. साधारणपणे ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी होण्याची अपेक्षा असते; मात्र यंदा पावसाची तीव्रता अधिकच वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला असून, यंदाच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. दुसरीकडे, भातलावणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

दरम्यान, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात दुष्काळ पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे तो अंदाज फोल ठरत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.