शहापूर : मुंबईहून गिर्यारोहणासाठी आलेल्या २५ जणांच्या समूहातील तरुणाचा शहापूर येथील डेहणे (वरपडी) भागात करवली धबधब्यातील पाण्यात पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला.
मृत तरुणाचे नाव सोनू सिंग (३०) असे आहे. रविवारी सकाळी ११च्या सुमारास २५ तरुणांचा समूह करवली धबधबा परिसरात गिर्यारोहण करत होता. यावेळी सोनू सिंगचा तोल जाऊन तो खाली पडला. पाण्यातील टोकदार दगडावर डोके आपटल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पाण्यात उतरून त्याला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, असे किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चोंढे येथे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीही पर्यटकांकडून निष्काळजीपणा होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.