* कोकण पाटबंधारे विभागाचा सर्वेक्षणाचा प्रस्ताव
* राम पातकर यांच्या पाठपुराव्याला यश
बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या पोशीर धरणाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कोकण पाटबंधारे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उल्हासनदीच्या पोशीर उपनदीवर धरण बांधणे योग्य होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर कोकण पाटबंधारे विभागाने यासाठी सर्वेक्षणाच्या कामाचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर यांनी धरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्तावित असलेल्या पोशीर धरणाच्या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाणी समस्या दूर होतानाच बदलापुरात उल्हासनदीला येणाऱ्या पुराचा धोका कमी होईल व शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल,असा विश्वास राम पातकर यांनी व्यक्त केला होता. जुलै-२०२२ मध्ये यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोशीर धरणाबाबत निवेदन सादर केले होते. यावर मजीप्राच्या ठाणे मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात पोशीर धरणाबाबत अनुकूलता दाखवली आहे. पुढील ३० ते ३५ वर्षाच्या पाणी मागणीसाठी नवीन स्त्रोतांची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात उल्हास नदीच्या पोशीर उपनदीवर पोशीर येथे एक धरण बांधल्यास त्याचे पाणी उल्हास नदीत घेऊन हे पाणी वापर संस्थांना भविष्यामध्ये उपलब्ध करून देणे शक्य होईल. वरील सर्व बाबींचा विचार करता, उल्हास नदीला प्रतिवर्ष येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी नियंत्रण मिळविण्यासाठी व ठाणे जिल्ह्याच्या भविष्यातील वाढत्या पाणी मागणीसाठी पाणी उपलब्ध होण्याकरीता उल्हास नदीच्या पोशीर उपनदीवर धरण बांधणे योग्य होईल, असे या कार्यालयाचे मत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांनीही यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना २५ ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. त्यानुसार १६ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत रायगड जिल्ह्यातील पोशीर व शिलाहार प्रकल्प या भविष्यकालीन योजना तातडीने मार्गी लावण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे प्रदेश कार्यालयाने कळविले आहे. त्याअनुषंगाने पोशीर व शिलाहार या भविष्यकालीन योजनांच्या बुडीत क्षेत्र व लाभक्षेत्र सर्वेक्षणाच्या कामांचे अंदाजपत्रकास सर्वसाधारण मान्यतेसह निविदा काढण्यास परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाकरिता लागणारा अनुक्रमे २३१.५५ लाख व १७७.०३ लाख इतका निधी नगरविकास विभागाकडून उपलब्ध होण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. हे पाहता पोशीर धरणाच्या निर्मितीच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत असल्याचे श्री. पातकर यांनी सांगितले.