वर्तकनगर वसाहतीतील पोलिसांना मिळणार न्याय

* तीन महिन्यात चालू होणार गृहप्रकल्प
* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

ठाणे : वर्तकनगर येथील पोलिसांच्या कुटुंबियांना घरे देण्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यात म्हाडा किंवा पीपीपीच्या माध्यमातून गृह बांधणी प्रकल्प सुरू होणार असल्याचे सांगितले.

लक्षवेधी मांडताना आमदार प्रताप सरनाईक यांनी सन १९७० च्या दशकात राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पोलिसांच्या वसाहतीची दुर्दशा सांगितली. तसेच सन २०१८ साली ठाण्याचे तत्कालिन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: वर्तकनगरमधील धोकादायक झालेल्या या इमारतींना भेट दिली असता इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये म्हणून एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंग स्कीमच्या घरांमध्ये पोलिसांच्या कुटुंबियांना स्थलांतरीत केले, परंतु, गेल्या तीन वर्षांपासून पोलिस वसाहतीच्या इमारती तोडून ठेवलेल्या असताना सुध्दा म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अद्यापपर्यंत या इमारतींचे काम चालू झाले नसल्याची नाराजी व्यक्त करून ’किमान म्हाडा नाही तर पी.पी.पी. तत्वावर तरी हा प्रकल्प राज्य शासनाने चालू करून पुर्ण करावा“, अशी विनंती श्री. सरनाईक यांनी गृहनिर्माण व गृहविभाग ही दोन्ही खाते असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सभागृहामध्ये त्याचे उत्तर देताना सांगितले की, वर्तकनगरमधील घरांच्या निर्मितीचे काम म्हाडा अथवा पी.पी.पी. तत्वावर पुढील तीन महिन्यात चालू करून वर्तकनगरमधील पोलिसांना लवकरात लवकर घरे कसे देता येईल, यासाठी शासन प्रयत्नशिल राहिल, असे आश्वासन दिले.

मुंबईच्या बी.डी.डी. चाळीच्या धर्तीवर सरसकट सर्व पोलिसांच्या कुटुंबियांना मोफत घरे उपलब्ध करून देता येणार नाहीत, पण वर्तकनगरमधील पोलिसांच्या बाबतीत शासनाची भूमिका सकारात्मक राहील, असे आश्वासनही दिले.