चोरीस गेलेला तीन कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला सुपूर्द

…अन त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

कल्याण : एखादी वस्तू चोरीला गेली तर त्याची पोलिसात तक्रार दाखल होते. चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची शाश्वती नसते. मात्र अशक्य अशी कामगिरी पोलिसांनी शक्य करून दाखवत कल्याणात प्रथमच तीन कोटींचा मुद्देमाल तक्रार धारकांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे त्या तक्रार धारकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. नवनिर्वाचित ठाणे पोलीस आयुक्तलयाचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते तक्रार धारकांना त्यांचे मुद्देमाल सुपूर्द करण्यात आले.

ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ च्या वतीने पोलीस वर्धापन दिन सप्ताहनिमित्त तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरण आणि हेल्प डेस्क लोकार्पण सोहळ्याचे आयोजन कल्याणात करण्यात आले. यावेळी आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे शहर यांच्या हस्ते हेल्प डेस्कचे लोकार्पण आणि मुद्देमाल देण्यात आला. यावेळी दत्तात्रय कराळे पोलिस सहआयुक्त, ठाणे शहर, संजय जाधव अप्पर पोलिस आयुक्त, दत्तत्रय शिंदे अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, सचिन गुंजाळ पोलीस उप आयुक्त आदीसह परिमंडळ ३ चे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांमध्ये जनतेच्या समस्या सोडवणे, जनताभिमुख होणे हा बदल होत चालला आहे, हा उद्देश सप्ताहापुरता नसून हे काम आपण वर्षभर करणार आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. हेल्प डेस्क हे मोबाइल किंवा सायबर सेल सन्दर्भात फ्रॉड असेल तर त्यासाठी ही संकल्पना मदतीची असणार आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु तसेच लोकाना कशाप्रकारे मदत होईल यासाठी प्रयत्नशील राहु, असे नवनिर्वाचित ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.

ज्या उद्देशाने काम करतो तो उद्देश सफल झाला आहे, असा पहिला कार्यक्रम कल्याणात होत आहेत, गेल्या वर्षात ४३ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. या मोक्कामुळे चेन स्नॅचिंग, चोरी, घरफोड़ी हे गुन्हे कमी झाले आहेत. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून या सेल्फ हेल्प डेस्कचे लोकार्पण करण्यात आले आहे. हा चांगला उपक्रम असून तक्रारदारांना याची मदत होणार असल्याचे दत्ता शिंदे यांनी सांगितले.

परिमंडळ ३ मध्ये रोख रक्कम, सोने-चांदी, मोबाईल, वाहने आणि इतर मिळून एकूण तीन कोटी १६ लाख, ७९,७९५ रुपयांचा मुद्देमाल तक्रार धारकांना परत करण्यात आला. यात रोख रक्कम २७ लाख ८० हजार, सोन्या-चांदीचे दागिने एक कोटी १५ लाख ४२,६७० रुपये, वाहने एक कोटी चार लाख ५२,३७५ रुपये, ३१४ मोबाईल ४३ लाख ५६,५०० रुपये, इतर मुद्देमाल २५ लाख ४८,२५० रुपये आदी ऐवजाचा समावेश होता.

कल्याणात एका महिलेचा रिक्षात राहिलेला सहा लाख रुपयांचा ऐवज परत केल्यामुळे प्रामाणिक रिक्षा चालक मोहन राठोड याचा पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.