ठाणे जिल्ह्यात १२४ गुन्हेगारांना बेड्या
ठाणे: ठाणे पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन ऑल आउट मोहिमेच्या अंतर्गत १२४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकून अनेक घातक हत्यारे जप्त केली, त्यामुळे गुन्हेगारांची एकच पळापळ झाली.
पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री संपूर्ण पोलीस आयुक्त परिसरात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवली होती. या मोहिमेत ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या सर्व परिमंडलातील ३०८ पोलीस अधिकारी आणि १६१९ पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. वाहतूक शाखेचे पोलीस देखील सहभागी झाले होते. काल रात्री पोलिसांच्या पथकाने विविध विभागात अचानक तपासणी मोहीम राबवली. त्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या चार जणांच्या मुसक्या बांधून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली. १५ फरार आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या २६ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. दारू विक्री करणाऱ्या ४६जणांच्या विरोधात तक्रार दाखल करून ४६जणांना अटक करण्यात आली. जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात आठ गुन्हे दाखल करून २०जणांना अटक करण्यात आली. गुन्हेगार प्रतिबंधक कायद्यानुसार सात जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी नाक्यांवर नाकाबंदी करून ३०८७ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १,२२३ वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आठ लाख ६६,२२० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.